अडीच हजार लोकसंख्येचे अख्खे टिक्केवाडी गाव गूळ काढण्याची परंपरागत प्रथेपोटी सोमवारी जंगलात रवाना झाले. यामुळे गाव ओस पडले आहे. जंगलात पोहोचलेले हे ग्रामस्थ पुढचे कांही दिवस गुऱ्हाळातून काळा व पांढरा गूळ काढण्याचे काम करणार आहेत. देवीचा कौल मिळणार नाही, तोपर्यंत ते घराकडे परतणार नाहीत. या काळात त्यांच्या घरामध्ये चोरी वा अन्य कसलाही अपप्रकार होण्याची भीती त्यांना श्रद्धेपोटी वाटत नाही.     
भुदरगड (गारगोटी) तालुक्याच्या गावापासून पंधरा किलोमीटर अंतरावर टिक्केवाडी गाव आहे. येथे अष्टभुजाई देवीचे मंदिर आहे. या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक वेगळीच प्रथा आहे. ती म्हणजे घर, दार सोडून संपूर्ण गांव जंगलामध्ये गूळ काढण्यासाठी जाण्याची. तीन वर्षांतून एकदा या प्रथेचे पालन गावातील आबालवृध्द करीत असतात. त्यामध्ये सामान्य नागरिकांपासून ते डॉक्टर, वकील, इंजिनिअर अशा उच्च शिक्षितांचाही समावेश आहे. गावावर संकट येऊ नये या श्रध्देने या प्रथेचे पालन केले जाते. त्याचे पालन करण्यासाठीच सोमवारी अवघा गाव जंगलात रवाना झाला असून तेथे वीस मोठय़ा झोपडय़ांमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे.     
विशेष म्हणजे गावात विभक्त असणारी मंडळी जंगलात भावकीचे नाते जपत एकत्र राहतात. महिला व पुरूष यांची राहण्याची सोय स्वतंत्र असते. जंगलातील निसर्गाचा आनंद घेत आणि सहभोजनाचा आस्वाद घेत सर्वजण तेथे राहतात. या कालावधीत जंगलात खास उभारण्यात आलेल्या गुऱ्हाळातून गूळ काढण्याचे काम केले जाते. यासाठी गावात विशिष्ट शेतातील ऊस राखून ठेवलेला असतो. तो ट्रॅक्टरव्दारे जंगलामध्ये नेला जातो. काळा व पांढरा अशा दोन प्रकारचा गूळ काढण्याचे काम तेथे होते. काळा गूळ कशासाठी असा प्रश्न केला असता वृध्द लोकांनी, पावसाळ्यात थंडावलेल्या शरीरात अधिक ऊर्जा मिळावी यासाठी काळ्या गुळाचा चहा उपयुक्त असतो असे सांगण्यात आले.     
गूळ काढण्यासाठी जंगलामध्ये कधी जायचे आणि तेथून कधी परतायचे याचा निर्णय देवीला कौल लावून घेतला जातो. काल रविवारी देवीला कौल लावल्यानंतर जंगलात जाण्याचा संकेत देणारा कौल मिळाला होता. त्यानुसार टिक्केवाडी गावकरी जंगलात पोहोचले आहेत. तेथे गूळ बनविण्याच्या काहिलीमध्येच सामुदायिक भोजन बनविले जाते. त्याचवेळी देवीला कौल लावून गावात कधी परतायचे याचे संकेत आजमाविले जातात.देवीचा कौल मिळाल्यानंतरच ग्रामस्थ गावाकडे परतात. तो मिळत नाही तोपर्यंत कितीही दिवस जंगलात राहण्याची वेळ आली तरी राहण्याची त्यांची तयारी असते. विशेष म्हणजे घरातील साहित्य जसे आहे तसेच ठेवून अन् कुलूप न लावताच ग्रामस्थ जंगलात जातात. गावात जनावरेही ठेवली जात नाहीत.     
एकेवर्षी  जंगलात जाण्यास उशीर झाल्याने गावातील अनेक जनावरे मृत्युमुखी पडल्याचा दाखला ग्रामस्थांकडून दिला जातो. पूर्वी गावामध्ये कॉलरा, पटकी यासारखे साथीचे आजार यायचे. अशा रोगराईच्या काळात गाव सोडून जाण्याची पध्दत होती. त्यातूनच टिक्केवाडीमध्ये गूळ काढण्यासाठी जंगलात जाण्याची प्रथा सुरू झाली आहे. कोल्हापूर हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी आजही या जिल्ह्य़ाच्या दक्षिणेला असलेल्या भुदरगड तालुक्यात गूळ काढण्याची प्रथा जपण्यासाठी सारा गाव जंगलामध्ये निवास करतांना आढळतो. यामध्ये देवीची श्रध्दा अधिक महत्त्वाची वाटते की हा अंधश्रध्देचा भाग आहे हे मात्र स्पष्ट होत नाही.

Change in traffic route due to Rath Yatra after ram navami in nashik
नाशिक : रथयात्रेमुळे वाहतूक मार्गात बदल
rain Mumbai,
मुंबईसह ठाण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
vasai fort leopard
वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना