करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीचा परिणाम सर्वदूर पाहावयास मिळत असून शेतीमालास योग्य भाव मिळत नसल्याने खरबूज पीक बांधावर फेकून देण्याची वेळ चोपडा बाजार समितीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांच्यावर आली आहे.

आधीच लहरी निसर्गचक्रामुळे अवकाळी पाऊस, वादळ, गारपीट आदींमुळे शेतातील तोंडी आलेला घास हिरावून घेण्यात आला आहे. त्यात टाळेबंदीमुळे कवडीमोल भाव मिळत आहे. बाविस्कर हे नोकरी करून शेती करतात. यावर्षी त्यांनी केळी पिकांत खरबूज लागवड केली होती. तालुका कृषी अधिकारी पी. एन. चौधरी यांनी त्यांच्या उपRमाचे कौतुक केले आहे. यासाठी त्यांना संजय शिरसाठ यांचे मार्गदर्शन तर आबा सोनवणे यांचे सहकार्य लाभले होते. किमान एक लाखापुढे बाविस्कर यांना उत्पन्न अपेक्षित होते. पण सध्याच्या टाळेबंदीमुळे खरबूजला पाहिजे तसा भाव न मिळाल्याने नफा तर दूर, खर्चही निघणे मुश्किल झाले. शेतात पक्व झालेला माल काढून किरकोळ विक्री करावी लागली. थोडाफार माल व्यापाऱ्यांनी अत्यल्प दराने खरेदी केला. दररोज शेकडो फळांचे मोफत वाटप करण्यात आले. मालाला उठाव नसल्याने शिल्लक राहिलेला माल बांधावर फेकावा लागला. बराच माल अतिउष्णतेमुळे शेतातच खराब झाला. त्यामुळे खूपच नुकसान सहन करावे लागल्याची बाविस्कर यांची भावना आहे.