राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडण्याची हिंमत इतर कोणत्याही राजकीय पक्षात नाही. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मंडळी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करतात. दिलीप बनकर यांच्यासारख्या उमेदवाराचा पराभव व्यासपीठावर बसणाऱ्यांकडून झाला, असे एकापेक्षा एक संशयाचे वाग्बाण सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यासपीठावरील नेत्यांसह उपस्थितांमध्ये खळबळ उडवून दिली. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी पवार यांच्या हस्ते झाले.
 यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्र्यांनी स्थानिक राजकारणासह जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला.
कार्यक्रमास आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर, आ. ए. टी. पवार आदी उपस्थित होते. गतवेळी निफाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप बनकर यांना पराभव स्वीकारावा लागला. त्या वेळी शिवसेनेचे उमेदवार अनिल कदम यांना भुजबळांकडून मदत झाल्याची चर्चा होती. पराभवानंतर राष्ट्रवादीच्या काही मंडळींमुळे पराभूत झाल्याची सलही बनकर यांनी बोलून दाखविली होती. या कार्यक्रमात पवार यांनी नेमक्या त्याच मुद्दय़ाला हात घातला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव इतर राजकीय पक्ष करू शकत नाहीत. आपल्याच पक्षातील काही मंडळी आपल्या उमेदवारांना पाडण्याचे काम करतात. या प्रकारांची राष्ट्रवादीने गंभीरपणे दखल घेणे गरजेचे आहे. जातीचे राजकारण कोणी करू नये. असे राजकारण कोणी केल्यास ते मातीत जातात, हे सांगण्यासही पवार विसरले नाहीत. रस्त्याला खड्डे ज्यांच्यामुळे होतात त्यांना निवडून देण्यात येते, अशी व्यथाही त्यांनी व्यक्त केली. कांद्याच्या दरवाढीच्या मुद्दय़ावर पवार यांनी शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ द्यावा, अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे सांगितले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही कोणत्याही स्थितीत कांद्यावर निर्यातबंदी घातली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
महागडय़ा कांद्याची झळ सर्वसामान्यांना नव्हे, तर राजकीय पक्षांनाही सहन करावी लागते, असेही त्यांनी सांगितले.