चारशे शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी आणि नागरिकांचा पाठिंबा; कर्करोग जागृती दिनानिमित्त आदर्श

शालेय वयात मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रयत्नांना वाळवा तालुक्यात यश आले असून, ३९८ शाळा १०० यार्ड परिसरात तंबाखूमुक्त करण्यात येत आहेत. जागतिक कर्करोग जागृती दिनाचे औचित्य साधून तशी घोषणा शनिवारी करण्यात येत आहे. यासाठी मुंबईची सलाम, राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी यांनी गेली दीड वष्रे जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत.

संस्कारक्षम वयात नको ती व्यसने लागली तर त्याचे आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम होतात. वाळवा तालुक्यात पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ३९८ शाळा असून, या शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा विडा उचलण्यात आला. यासाठी शालेय स्तरावर प्रयत्न करण्याबरोबरच ग्रामपंचायतींचे सहकार्य घेण्यात आले. निमशहरी भागात शाळेजवळ पानाचे ठेले पाहण्यास मिळतात. मात्र परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी शाळेच्या आसपासचा १०० यार्ड म्हणजेच ९२.३३ मीटर परिसर तंबाखूमुक्त  ठेवणे आवश्यक आहे.

शाळा परिसर तंबाखूमुक्त आहे की नाही हे ठरवण्यासाठी वेगवेगळे ११ निकष निश्चित करण्यात आले आहेत. या निकषाचे पालन वाळवा तालुक्यातील ३९८ शाळांनी केले असून, या शाळेत सुमारे ९० हजार विद्यार्थी पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत.

शनिवारी जागतिक कर्करोग जागृती दिन असून, या दिनाचे औचित्य साधून वाळवा तालुका शाळा परिसर तंबाखूमुक्त झाल्याची घोषणा करण्यात येत आहे.

नियम काय?

  • निमशहरी भागात शाळेजवळ पानाचे ठेले पाहण्यास मिळतात. मात्र परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी शाळेच्या आसपासचा १०० यार्ड म्हणजेच ९२.३३ मीटर परिसर तंबाखूमुक्त ठेवणे आवश्यक आहे, मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष होते.

केले काय?

  • शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याद्वारे जागृती मोहीम हाती घेण्यात आली. शाळेच्या परिसरात असलेली पानटपरी मर्यादेच्या बाहेर हलवण्यात आली. तंबाखूच्या दुष्परिणामाची माहिती देणारी भित्तिपत्रके, पोस्टर परिसरात लावण्यात आली. मुलांच्या प्रचार फेऱ्या काढून जागृती करण्यात आली. याची पडताळणी मुंबईच्या सलाम या समाजसेवी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली.