पात्र लाभार्थ्यांना ३१ डिसेंबपर्यंत संधी; जिल्हा परिषदेचे आवाहन

पालघर : जिल्ह्य़ात शौचालय बांधकामासाठी देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदानाची अंतिम तारीख ही ३१ डिसेंबर असल्याने त्यानंतर हे अनुदान बंद होणार आहे, तत्पूर्वी या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांनी केले आहे.

केंद्र शासनाकडील पत्राद्वारे व राज्य शासनाच्या वतीने २९ नोव्हेंबर  रोजी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांनी विहित मुदतीत राज्यातील जिल्ह्य़ांना शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्तता होण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर काम करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या सूचना दिल्या आहेत.

पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबांसाठी (एल.ओ.बी.) शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांनी सर्व आठ तालुक्यांचा स्वच्छ भारत मिशन योजनांचा आढावा घेऊन शौचालय बांधकामांसाठी ३१ डिसेंबर रोजी पूर्ण लाभार्थ्यांना प्रोत्साहन अनुदान वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्य़ात पायाभूत सर्वेक्षण २०१२ नुसार शौचालय बांधकामे उद्दिष्ट ०२ ऑक्टोबर २०१७ रोजी पूर्ण झाले होते. तर पायाभूत सर्वेक्षणातून मधून सुटलेले वाढीव कुटुंबाचे (एल.ओ.बी.) उद्दिष्टपूर्तीदेखील अंतिम टप्प्यात आहे.

शासनाने या दोन्ही घटकांतून सुटलेल्या कुटुंबासाठी एक शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘नो वन लेफ्ट बिहाइंड’ या अंतर्गत पायाभूत सर्वेक्षण व वाढीव कुटुंबातून सुटलेल्या व शौचालय नसलेल्या पात्र लाभार्थ्यांची संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी लाभार्थ्यांने स्वतंत्र शिधापत्रिका, आधारकार्ड व ग्रामपंचायतीकडील नमुना आठ इत्यादी कागदपत्राची पूर्तता करण्याची आवश्यक आहे.

संकेतस्थळावर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांने शौचालय बांधकाम करून त्याचा वापर केल्यास प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. परंतु  ३१ डिसेंबपर्यंतच ही संधी आहे. प्रक्रिया मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहे. यापुढे जिल्ह्य़ातील कोणतेही

पात्र कुटुंब शौचालयविना राहणार नाही.

यादृष्टीने ही शौचालय बांधकामे २५ डिसेंबर पूर्वीच पूर्ण होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणांनी मोहीम राबवण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.