जोपर्यंत जिभेला धार आहे तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढा सुरूच राहील, शेतीबाबत काही धोरणे ठरवायची असल्याने पुन्हा लोकसभेत जाणे भाग असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

राजमती ट्रस्टच्या वतीने शुक्रवारी शेट्टी आणि नाशिकचे कृषी उद्योजक विलास शिंदे यांना श्रवणबेळगोळचे चारूकीर्ती महास्वामी यांच्या हस्ते जनसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी शेट्टी बोलत होते. या प्रसंगी ट्रस्टचे मानद सचिव सुरेश पाटील, जयश्री पाटील, सुदर्शन पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, माझ्या मिशीला खरकटे लागलेले नाही. त्यामुळे मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतच राहणार आहे. जोपर्यंत जिभेला धार आहे तोपर्यंत माझा संघर्ष सुरूच राहील. शेतमालाला दर मिळण्यासाठी केवळ रस्त्यावरचा संघर्ष उपयुक्त ठरत नाही, तर कायद्यातही सुधारणा करावी लागणार आहे. यासाठी मला २०२४ मध्ये लोकसभेत जायचे आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकरी हितापेक्षा व्यापारी हिताकडे अधिक लक्ष दिले जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. यावेळी बोलताना चारूकीर्ती महास्वामी म्हणाले, कृषी क्षेत्र हा देशाचा कणा आहे. कितीही औद्योगिक प्रगती झाली तरी कृषी विकास होत नाही तोपर्यंत या विकासाचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचणे अशक्य आहे. या कार्यक्रमात मानद सचिव पाटील यांनी प्रास्ताविक केले, या प्रसंगी राजगोंडा पाटील, अविनाश पाटील, दीपक पाटील यांचाही गौरव करण्यात आला.