राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री तथा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे सलग तीन दिवस ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एका खासगी रिसोर्टमध्ये मुक्कामी होते. ठाकरे यांचा हा दौरा पूर्णत: खासगी होता. या दौऱ्यात त्यांनी व्याघ्र सफारीचा आनंद लुटल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तर, या दौऱ्यात ताडोबात त्यांच्यासोबत आणखी कोण होते? याची माहिती मिळू शकलेली नाही. एका रिसोर्टमध्ये त्यांचा मुक्काम होता. रिसोर्ट कंपनीनेही या दौऱ्याबाबत गुप्तता बाळगली होती. मात्र भाजपा आमदार नितेश राणे यांच्या टीकेनंतर आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची सर्वांना माहिती झाली होती. विशेष म्हणजे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनाही या दौऱ्याची कल्पना नव्हती.

महाविकासआघाडी सरकारचे पर्यावरणमंत्री तथा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे सोमवार १५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास चिमूर मार्गे ताडोबा प्रकल्पात दाखल झाले. त्यानंतर ते सलग दोन दिवस म्हणजे १६ व १७ मार्च दुपारपर्यंत ताडोबात मुक्कामी होते, अशी माहिती समोर आली आहे.

या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी ताडोबातील व्याघ्र सफारीचा आनंद लुटला. विशेष म्हणजे त्यांच्या या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तथा वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी वगळता ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत कुणालाही माहिती नव्हती. त्यांचा हा दौरा पूर्णत: खासगी होता असे सांगण्यात आले. दरम्यान आज १७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता ते ताडोबातून बाहेर पडले. त्यानंतर थेट नागपूर विमानतळ गाठून मुंबईला रवाना झाले.