ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघांना घेरून छायाचित्रे काढल्याच्या ‘लोकसत्ता’त प्रकाशित झालेल्या सचित्र वृत्तानंतरही पर्यटकांना खुली सूट देण्यात आल्याचे वन खात्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी नाकारले आहे. एक्स्प्रेस वृत्त समूहाशी बोलताना त्यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा फक्त २० टक्के भाग पर्यटकांसाठी खुला केल्याचा दावा केला. उर्वरित भाग पर्यटकांसाठी अजूनही बंद असून फक्त सहा वाघांचे अस्तित्व असलेले भाग खुले असून पर्यटकांची गर्दी होत असल्याचा अतिरेक प्रसारमाध्यमे करीत आहेत, अशी सारवासारव केली आहे. ताडोबाच्या संरक्षित क्षेत्रातील ४२ वाघांचे अस्तित्व असलेल्या भागांमध्ये पर्यटकांना बंदी आहे. त्यामुळे पर्यटकांना खुली सूट दिल्याचे वृत्त चुकीचे आहे, असेही परदेशी यांनी म्हटले आहे.
‘लोकसत्ता’त प्रकाशित झालेल्या सचित्र वृत्तानंतर व्याघ्रप्रेमी आणि पर्यावरणवाद्यांचे वर्तुळ प्रचंड अस्वस्थ झाले असून यावर ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करून वनमंत्री पतंगराव कदम यांना धारेवर धरले आहे. या मुद्दय़ावर बोलताना प्रवीण परदेशी म्हणाले, सहा वाघांचे अस्तित्व असलेला भाग पर्यटकांना खुला आहे. उर्वरित भागात जाण्याची पर्यटकांना अनुमती देण्यात आलेली नाही. पर्यटकांची संख्या वाढत असल्याने तसे चित्र निर्माण झाले आहे. पर्यटकांच्या खुल्या जिप्सीसमोरून वाघ जात आहेत, कारण पर्यटकांच्या वावराची या वाघांना सवय झाली असावी. व्याघ्र प्रकल्पांमध्ये असे चित्र आढळून येते. मध्य प्रदेशातील बांधवगड, कान्हा येथेही असेच चित्र आहे. मध्य प्रदेशात हत्तींचा वापराने वाघांना थांबवून ठेवण्यात येते. तसे महाराष्ट्रात घडत नाही.