घंटागाडय़ा, सफाई कामगारांची संख्या वाढवणार; डास नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना

पालघर : पालघर शहराची स्वच्छता राखण्यासाठी नगर परिषदेने विशेष उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. त्याची अंमलबजावणी एप्रिल महिन्यापासून होणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे नगरपरिषदेच्या बैठकीचे थेट प्रक्षेपण करण्यासही मंजुरी मिळाल्याने नगरपरिषदेच्या बैठकीचा कारभार पालघरचे नागरिक यापुढे थेट पाहू शकणार आहेत.

पालघर नगरपरिषदेच्या १७ फेब्रुवारी रोजी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत स्वच्छतेविषयी उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली. कचरा उचलण्यासाठी असलेला ठेका पूर्व-पश्चिम असा दोन प्रकारे विभागला जाणार आहे. कचरा उचलण्याचे काम सध्या १६ घंटागाडय़ा करत असून त्यामध्ये आणखी १० घंटागाडय़ांची वाढ होणार आहे. कचरा गोळा करण्यासाठी हायड्रॉलिक प्रेस प्रकारच्या आधुनिक गाडय़ांची लवकरच खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरामधून कचरा उचलण्याच्या कार्यक्षमतेमध्येही वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे सध्या असलेल्या ४० सफाई कामगारांची संख्या वाढवून शहरातील स्वच्छतेच्या कामांसाठी एकूण ९० सफाई कामगारांना नगरपरिषदेने मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर तसेच नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एप्रिल महिन्यापासून या उपाययोजनांना आरंभ होईल, असा विश्वास नगरपरिषद प्रशासनाने व्यक्त केला.

पालघरमध्ये डासांची संख्या वाढल्याने त्यावर नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर उपाययोजना आखण्यात येणार आहे.  साचलेल्या पाण्यावर तेल टाकले, शौचालयाच्या वेंट पाइपला जाळ्या बांधणे अशा उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. पालघर नगरपरिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना हिवताप विभागाकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.

‘प्लास्टिक बंदी’चे काटेकोर पालन

पालघर शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे पुन्हा दिसून आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीची काटेकोर पालन करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहे. पालघर नगर परिषदेच्या प्लास्टिक पिशव्या विरुद्ध भरारी पथकाने गेल्या काही दिवसांत ८० किलो प्लास्टिक पिशव्या हस्तगत केल्या असून २५ हजार रुपयांहून अधिक दंडात्मक रक्कम वसूल केल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे.

उपाययोजना काय?

* सध्या १६ घंटागाडय़ा. आणखी १० घंटागाडय़ा वाढणार.

* कचरा गोळा करण्यासाठी हायड्रॉलिक प्रेस प्रकारच्या आधुनिक गाडय़ांचा वापर.

* सफाई कामगारांच्या संख्येत वाढ.

* डास नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना.

* आरोग्य कर्मचाऱ्यांना हिवताप विभागाकडून प्रशिक्षण.

नगरपरिषद बैठकांचे थेट प्रक्षेपण

नगरपरिषद बैठकांमध्ये होणाऱ्या चर्चेची नागरिकांना माहिती व्हावी तसेच नगरपरिषदेचे कामकाज पारदर्शक व्हावे म्हणून नगरपरिषद बैठकांचे थेट प्रक्षेपण करण्यास नगरपरिषद प्रशासनाने मंजुरी दिली. या कामी आवश्यक ती साधन सामग्री घेण्यासाठी निविदा प्रक्रिया हाती घेण्यात येणार असून त्यानंतर नगरपरिषदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.