कलिंगडाच्या खरेदीस व्यापाऱ्यांचा नकार, शेतकऱ्यांना आर्थिक चटके

दिगंबर शिंदे, लोकसत्ता

सांगली : अंगाची लाहीलाही करणारे वाढते तापमान. उन्हात शरीराला थंडावा देणारे देशी फळ म्हणजे कलिंगड. थंडावा देणाऱ्या कलिंगडाला मागणीही आहे, उठावही आहे, मात्र त्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र आर्थिक चटके बसत आहेत. टाळेबंदीचे कारण सांगून कलिंगडाच्या खरेदीला व्यापारी नकार देत आहेत. शेतकऱ्यांना करोनाचे हे चटके उन्हापेक्षा तीव्रतेने बसत आहेत.

जिल्ह्य़ातील पुणे बाजारपेठ नजरेसमोर ठेवून वांगी, कडेगाव परिसरांतील शेतकरी कलिंगडाची लागवड करतात. दर वर्षी शहरी भागात चांगले ग्राहक मिळत असल्याने व्यापारीही जागेवर येऊन टनावर कलिंगड खरेदी करीत असतात. निचऱ्याची जमीन आणि हंगामी पाणी यावर वांगी, कडेगाव परिसरांत सुमारे दीड-दोनशे एकर क्षेत्रावर कलिंगडाची लागवड करण्यात आली आहे.

कलिंगडचा हंगाम प्रामुख्याने शिमग्यानंतर सुरू होतो. यंदा करोनाचे संकट फेब्रुवारीपासूनच घोंघावत असताना मार्चअखेरीस याचे प्रत्यक्ष परिणाम जाणवू लागले. आज शहरात कलिंगड विक्री करणारी वाहने फिरत आहेत. मात्र दर नेहमीइतकाच असला तरी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हाती पैसे किती मिळतात? गरजू शेतकऱ्यांकडून दोन रुपये किलोनेही खरेदी होत नाही, मात्र बाजारात त्याचे दहा रुपये केले जात आहेत. मातीत घाम गाळून उत्पादन करणारा शेतकरी एकीकडे कंगाल, तर मध्यस्थ व्यापारी मालामाल अशी गत आहे.

करोना संकटाला तोंड देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या युद्धाची झळ शेती व्यवसायाला सर्वाधिक बसली आहे. शेतीमालाची साठवणूक करण्याची अथवा प्रक्रिया उद्योगच नसल्यामुळे माल तयार झाला तर तत्काळ बाजार दाखविल्याविना पर्यायच हाती नाही. याची झळ सध्या वांगी (ता. कडेगाव) परिसरातील कलिंगड उत्पादक शेतकरी सोसत आहेत. कडक उन्हाळ्यातील लोकांची प्रचंड मागणी तसेच दरवर्षी मुस्लीम बांधवांच्या उपवासाच्या रमजान महिन्यात कलिंगडाला असणारी नेहमीची मागणी आणि यामुळे मिळणारा चांगला दर या अनुषंगाने या वर्षीही कलिंगडाला चांगला दर मिळेल या अपेक्षेने कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ६० ते  ७० हेक्टरवर कलिंगडची शेती करण्यात आली. यापैकी सुमारे १५ हेक्टर कलिंगड लागवड एकटय़ा वांगी गावातील शेतकऱ्यांनी केली होती.

मार्चअखेरपासून टाळेबंदी जाहीर झाल्याने सर्व भाजीपाला बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती, आठवडा बाजार तसेच वाहतूक करणारी वाहने बंद असल्याने शेतकऱ्यांचा माल शेतातच पडून आहे. गिऱ्हाईक नसल्याने व्यापारी फिरकत नाहीत, तर काही किरकोळ व्यापारी या बंदचा फायदा उठवत शेतकऱ्यांकडून कलिंगड केवळ २ ते ३ रुपये किलो दराने खरेदी करून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करीत असल्याचे चित्र आहे. तर काही शेतकऱ्यांचा माल चांगला भाव मिळत नसल्याने आणि वाहतुकीची सोय नसल्याने शेतात पडून सडत आहे.

शेतकऱ्यांनी कलिंगडासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. त्यासाठी त्यांनी बँका आणि खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे; परंतु कलिंगडला दर नसल्याने त्यांच्या डोक्यावर लाखो रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. कर्ज फेडण्याची चिंता त्यांना आहे.

या वर्षी सेंद्रिय कलिंगडची एक एकरची लागवड करण्यात आली आहे. पीक चांगले आले असून त्यांसाठी १.५० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत; परंतु सध्या करोना संकटामुळे माल तसाच शेतात पडून आहे. व्यापाऱ्यांकडून २ ते ३ रुपये किलो दराने मागणी केली जात आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.    – नितीन सूर्यवंशी, कलिंगड उत्पादक शेतकरी