नीरज राऊत

पालघरमधील नागरिकांना सध्या घरपोच ताजे मासे उपलब्ध होत आहेत आणि त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसादही मिळत आहे. तरीही समुद्रात मुबलक मासळी आहे, हे त्यामागील खरे कारण नाही. टाळेबंदीत अनेकांचे पारंपरिक व्यवसाय बंद झाल्याने आणि नोकऱ्या गमवाव्या लागल्याने शहरात सध्या भाजी आणि ऑनलाइन मासेविक्रीच्या दुकानांच्या संख्येत भर पडली आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्तोरस्ती ठेले लावण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी बंद दुकानांसमोर विक्रेत्यांनी पथारी पसरली आहे.

टाळेबंदीत भाजीपाला विक्री करण्यास मुभा देण्यात आली होती. त्यात अनेक दुकानदारांनी मूळ व्यवसाय बाजूला ठेवून भाजीपाला विक्रीला सुरुवात केली होती. आता टाळेबंदी काही अंशी उठविल्यानंतरही काहींनी जोडव्यवसाय म्हणून भाजीपाला विक्री आणि मासेविक्रीकडे मोर्चा वळवला आहे. खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या  छोटय़ा व्यावसायिकांनी टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यात मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना माघारी परतणे जवळपास अशक्य झाले. त्यामुळे त्यांच्या व्यवसायातील जागा नव्या आणि गरजूंनी पटकावल्याचे चित्र सध्या पालघरमध्ये दिसत आहे. करोनामुळे लादली गेलेली टाळेबंदी म्हणजे मोठे संकटच होते. यात अनेकांच्या संसाराची घडीच विस्कटली गेली. काहींच्या तर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे मग या व्यवसायात उतरल्याशिवाय पर्याय उरला नाही, अशी प्रतिक्रिया येथील एका विक्रेत्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. जिल्ह्य़ातील उद्योगचक्र थांबल्याने कामगारांचे मोठे हाल झाले आणि आताही काही चांगली परिस्थिती आहे, अशातला भाग नाही, असे मत एका विक्रेत्याने नोंदवले. टाळेबंदीचे काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. काहींनी उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे; पण त्यांना बाजारात म्हणावा तितका उठाव नाही. भाडेतत्त्वावर दुकाने चालविणाऱ्या अनेकांना ती उत्पादने विकताना अडचणी येत आहेत. त्यामुळे पर्यायी उत्पादने विकण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे एका दुकानदाराने सांगितले. डेअरी, सायकल, दुचाकी दुरुस्ती, मोबाइलच्या बंद दुकानांसमोर भाजीच्या टोपल्या घेऊन बसलेले विक्रेते दिसत आहेत.

केक व्यवसायाला बहर

‘केक’ या शब्दावरून इंग्रजीत अनेक म्हणी आहेत. म्हणजे आश्चर्यकारक पद्धतीने हाती पडलेली एखादी संधी अथवा एखादा फायदा. म्हणजे कोणताही तोटा सहन न करता नफा मिळविण्याची हमी; परंतु करोनाकाळात केकचा व्यवसायही ठप्प झाला होता आणि मालाला उठावही नव्हता. त्यामुळे मध्यंतरी केकनिर्मिती व्यवसायात मंदी होती. आता अनेकांनी घरच्या घरी केक तयार करण्याची कला अवगत केली आहे. बाजारात मिळणाऱ्या केकप्रमाणेच सुंदर, चविष्ट केक तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.