आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील वाहतूक कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले असून आजपासून दोन दिवस (दि.८, ९) ते संपावर असणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीला समोरे जावे लागणार आहे.

कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात यावी तसेच दरमहिना २४ हजार रुपये किमान वेतन मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी वाहतूक कर्मचारी आजपासून (मंगळवार) सांपावर जाणार आहेत. त्यातच मुंबईमध्ये बेस्टच्या कर्मचाऱ्यांनीही सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला असल्याने मुंबईकरांचे चांगलेच हाल होणार आहेत. वाहतूक कर्मचाऱ्यांच्या संपाबरोबरच बँक, वीमा आणि बंदरावर काम करणारे कामगार तसेच खासगी कंपन्यांचे कर्मचारीही संप पुकारणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना अनेक त्रासाला तोंड द्यावे लागणार आहे.

ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस, चालक शक्ती युनियन तसेच आयटक, इंटक आणि सीटू या वाहतूक संघटनाही संपात सहभागी होणार आहेत. या कामगारांनी संसदेत पारित झालेल्या मोटार वाहन सुधारणा विधेयकाला विरोध दर्शवला असून वाहतुक क्षेत्रातील कामगारांना कामगार कायद्याचे संरक्षण तसेच सामाजिक सुरक्षाही नाही त्यामुळे हा संप पुकारण्यात आला आहे.

देशभरातील ओला-उबर या कॅबसेवेसह खासगी बस, रिक्षा, टॅक्सी चालक या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी कोंडी होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील अडचणी अद्यापही कायम असल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी डाव्या संघटनांनी ग्रामीण हडताल करण्यात येणार आहे. या संपांतर्गत रस्ता रोको, रेल रोको करण्यात येणार आहे.