राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ व ४ मध्ये सदोष इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर झाल्याचे सिद्ध झाल्याने या प्रभागातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या विद्यमान नगराध्यक्षा स्नेहा कुवेसकर यांच्यासह आणखी तीन नगरसेवकांना अपात्र ठरवून, येथे फेरनिवडणूक घेण्यात यावी, असे आदेश जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश मकरंद केसकर यांनी दिले आहेत. यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला आहे.
दरम्यान, या प्रभागात पोटनिवडणुकीनंतर सत्तेची समीकरणे बदलून काँग्रेसच्या हाती असलेली जिल्ह्य़ातील एकमेव सत्ता जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सन २०११ मध्ये झालेल्या राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रथमच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यात आला होता. मतमोजणीच्या वेळी शिवसेनेचे तत्कालीन पक्षप्रतोद व पराभूत उमेदवार अशोक गुरव यांना मतदान यंत्रावर झालेले प्रत्यक्ष मतदान व मोजणी झालेले मतदान यामध्ये तफावत असल्याचे आढळून आल्याने त्यांनी ही बाब आमदार राजन साळवी यांच्या कानावर घातली. साळवी यांनी याची गंभीर दखल घेऊन, त्याची शहानिशा करून संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेतली व इलेक्ट्रॉनिक मशीन सदोष असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. परंतु निवडणूक प्रशासनाने उदासीनता दाखविल्याने आ. साळवींनी न्यायालयाचा मार्ग धरला.
त्यानुसार शिवसेनेचे पराभूत उमेदवार अशोक गुरव, नरेंद्र कोंबकर, संजय पवार व कल्याणी रहाटे यांनी रत्नागिरीतील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. बाबा परुळेकर यांच्या माध्यमातून याप्रकरणी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला. या दाव्यामध्ये राजापूर न.प.च्या प्रभाग क्र. ३ व ४ मधील इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन या सदोष असल्याचे स्पष्ट करताना मशीनमध्ये नोंदले गेलेले एकूण मतदान व मोजणी करण्यात आलेले मतदान यामध्ये फरक असल्याने ही मतमोजणी कायदेशीररीत्या झाली नसल्याचे नमूद करून निवडणूक रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
साक्षी-पुराव्यांच्या सखोल तपासणीअंती जिल्हा न्यायाधीश मकरंद केसकर यांनी या चार विजयी उमेदवारांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान मशीनवर नोंदले गेलेले मतदान हे सदोष असल्याचे सांगत प्रभाग क्र. ३ मधील हनीफ मुसा काझी, हनीफ युसूफ काझी, स्नेहा कुवेसकर तसेच प्र. क्र. ४चे रुपेश साखरकर या काँग्रेसच्या चार नगरसेवकांना अपात्र ठरवून या दोन्ही प्रभागांत फेरनिवडणूक घेण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रभागात होणाऱ्या पोटनिवडणुकीनंतर राजापूर नगर परिषदेतील सत्ता समीकरणे बदलून जिल्ह्य़ात असलेली एकमेव सत्ता काँग्रेसच्या हातून जाण्याची दाट शक्यता आहे. या निकालाला आता उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू असल्याचे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.