11 August 2020

News Flash

ट्रकचालकाचा खून करून ७५ लाखांची दूध पावडर पळवणाऱ्या टोळीतील ७ जणांना अटक

टोळीचा सूत्रधार याच डेअरीत पूर्वी कामाला होता.

(संग्रहित छायाचित्र)

नगर : एमआयडीसी जवळील निंबळक बाह्य़वळण रस्त्यावर, आठवडय़ापूर्वी ट्रकचालकाच्या झालेल्या खुनाचे रहस्य अखेर पोलिसांनी उलगडले आहे. चालकाचा खून करून सुमारे ७५ लाख रुपयांची दूध पावडर पळवणाऱ्या टोळीतील ७ जणांना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रात्री अटक केली. पुणे जिल्ह्य़ातील इंदापूर येथील सोनाली डेअरी कंपनीची ही दूध पावडर होती. टोळीचा सूत्रधार याच डेअरीत पूर्वी कामाला होता. त्याने पाळत ठेवून किमती दूध पावडर पळवण्याचा कट रचला होता, असे तपासात निष्पन्न झाले आहे. टोळीचा सूत्रधार बीड जिल्ह्य़ातील आहे. अटक केलेल्या सातही जणांना नगरच्या न्यायालयाने दि. १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

दिलीप अशोक मुंढे (३३, सोनहिवरा, परळी, बीड, सध्या भोसरी, हवेली, पुणे) या सूत्रधारासह रोहित ऊर्फ दाद्या शहाजी बनसोडे (२०, ढवळस, माढा, सोलापूर), महेश मोहन शिंदे (२१, कुर्डूवाडी, माढा, सोलापूर), ज्ञानेश्वर ऊर्फ सोनू विष्णू राऊत (२३, माढा, सोलापूर), शिवाजी धनाजी पाटील (३३, उजनी, माढा, सोलापूर), रविराज ज्ञानदेव बनसोडे (ढवळस, सोलापूर) या सहा जणांसह दूध पावडर विकत घेणारा शाहिद इस्माईल शेख (३६, मूळ रा. वडजी, वासी, उस्मानाबाद, सध्या रा. मोशी, हवेली, पुणे) या सात जणांना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा गुन्हा तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी ही माहिती दिली. प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक अर्जित चांडक, उपअधीक्षक अजित पाटील, मंदार जावळे आदी उपस्थित होते. गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप पाटील, हवालदार मनोहर गोसावी, दत्ता गव्हाणे, सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, सोन्याबापु नानेकर, रवींद्र कर्डिले, आण्णा पवार, भागीनाथ पंचमुख, रवि सोनटक्के आदींच्या पथकाने तपास केला.

दि. ३० डिसेंबरच्या रात्री निंबळक बायपास रस्त्यावरील लामखडे पेट्रोल पंपाजवळ ट्रक चालक (एमएच १६ एवाय ६७६९) गोरख मारुती वलवे (५६, रा. सारोळा कासार, नगर) यांचा भोसकून खून करून ट्रकसह त्यातील १ हजार गोण्या दूध पावडर (किंमत सुमारे ७४ लाख ५० हजार रु.) पळवण्यात आली होती.

कट रचून गुन्हा

मृत गोरख वलवे याचा एक ट्रक सोनाई डेअरीच्या दूध वाहतुकीसाठी लावला होता. याच दूध डेअरीत टोळीचा सूत्रधार दिलीप मुंढे पूर्वी काम करत होता. त्यामुळे दूध पावडर किमती असते, याची त्याला माहिती होती. त्याच्या विरुद्ध बीड जिल्ह्य़ात बलात्कारासह चार गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याने भोसरी येथील गोदाम फोडून दूध पावडरच्या गोण्या याच गुन्ह्य़ातील शाहिद शेखला विकल्या होत्या. हा गुन्हा पचल्याने त्याचे धाडस वाढले. त्याने पुणे परिसरात काम करणाऱ्यांची टोळी तयार केली. केवळ पैसे मिळवण्याच्या हेतूने त्यांनी ट्रकचालकाचा खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यासाठी ही टोळी स्कॉर्पिओ घेऊन या ट्रकच्या पाठलागावर होती. त्यापूर्वी दिलीप मुंढे हा इंदापूर येथील दूध डेअरीपासून ट्रकच्या पाळतीवर होता. ट्रक पळवल्यानंतर चालकाचा खून करायचा हे टोळीने ठरवले होते.

पथकाला १० हजार रु. चे बक्षीस

या गुन्ह्य़ाचा कोणताही सुगावा नसताना पोलिसांनी चिकाटीने तपास करून आठवडय़ात तो उघडकीला आणल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तपासात गुन्हा कट करून रचल्याचे निष्पन्न झाल्याने खुनाचे कलम ३०२ ऐवजी दरोडा टाकताना खून केल्याचे ३९६, कट रचल्याचा १२० ब गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४२ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

इंदापुर येथून पाठलागावर असलेल्या टोळीने नगरपर्यंत दूध पावडरच्या ट्रकचा मार्ग काढला, शहराजवळील खडका टोलनाक्याजवळ स्कॉर्पिओ आडवी लावून गोरख वलवे यांना स्कॉर्पिओमधून निंबळक बायपास येथे आणण्यात आले. तेथे नैसर्गिक विधीसाठी वलवे याला उतरवण्यात आले, तेथेच त्याचा भोसकून खून करण्यात आला. या तपासासाठी पोलिसांनी नगर-औरंगाबाद, नगर-पुणे-चाकणपर्यंत, नगर-दौंड रस्त्यावरील विविध टोलनाके, धाबे, हॉटेलवरील सुमारे ४२ सीसीटीव्ही फुटेजची माहिती संकलित केली. त्यात दौंड रस्त्यावर एक स्कॉर्पिओ एका ट्रकचा वारंवार पाठलाग करताना आढळल्याने संशय बळावला. तपासात आरोपींना सोलापूर, पुणे व मुंबईतुन ताब्यात घेण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2020 3:16 am

Web Title: truck driver murder milk powder akp 94
Next Stories
1 नांदेड : औद्योगिक विस्तार प्रक्रिया रखडलेलीच!
2 लातूर : लातूरकरांची रडगाणी; उजनीचे पाणी
3 हिंगोली सिंचन अनुशेषाचा कागदी खेळ; असंवेदनशील यंत्रणांमुळे भिजत घोंगडे
Just Now!
X