तृप्ती देसाई यांच्या भूमाता बिग्रेडच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षा माधुरी शिंदे (४०) यांची शनिवारी त्यांच्या पतीनेच हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिरोळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या अशी माधुरी शिंदे यांची ओळख होती. पतीने कुहाऱ्डीचे वार करून खून केला. चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मुलीने फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी सूर्यकांत शिंदे (४०) याला पोलिसांनी अटक केली आहे.
माधुरी शिंदे या शिरोळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या होत्या. भूमाता बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या संघटनेच्या त्या कोल्हापूर जिल्ह्याच्या उपाध्यक्षा होत्या. शिरोळ तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या छत्रपती गृपच्याही त्या उपाध्यक्षा होत्या. या संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी शिरोळ विधानसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती.
या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून माधुरी शिंदे यांचा तालुक्यात सतत सामाजिक कार्यात वावर होता. मात्र त्यांचे हे काम मोलमजुरी करणारे त्यांचे पती सूर्यकांत यांना मान्य नव्हते. त्यातून पती आणि पत्नीमध्ये सातत्याने भांडण व्हायची. आज सकाळी माधुरी या घरकाम करत असताना सूर्यकांत हे बाहेरून घरी आले. त्यांनी येताना कुऱ्हाड सोबत आणली होती. बेभान झालेल्या सूर्यकांत यांनी माधुरी यांची मान, गळा आणि डोक्यात तीन वार केले. ते इतके वर्मी होते कि त्यातच माधुरी यांचा अंत झाला. खून केल्यानंतर सूर्यकांत यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा केल्याची कबुली दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 23, 2018 7:54 pm