न्यायालयाच्या आदेशाने घरजागेचा ताबा घेण्यास आलेल्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांना कार्यवाही करण्यास विरोध करीत घराच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरातील शुक्रवार पेठ-भांडी गल्लीत हा नाटय़मय प्रकार घडला.
स्वप्नील प्रभाकर वाले (३१) असे या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात त्याचा जीव बचावला गेला तरी पायाला मात्र मोठी दुखापत झाली. न्यायालयीन कर्मचारी राणप्पा पारोजी झिपरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या स्वप्नील वाले व उज्ज्वल मोहरे यांच्यात घरजागेवरून वाद आहे. स्वप्नील याचे वडील प्रभाकर वाले यांनी काही वर्षांपूर्वी शेजारचे भांडे व्यापारी मोहरे यांच्याकडून हातउसनी रक्कम घेतली होती. ही रक्कम परत करता न आल्यामुळे त्यांनी आपल्या मालकीची घरजागा मोहरे यांच्या नावे करून दिली होती. मोहरे यांना या घरजागेचा ताबा मिळाला नव्हता. दरम्यान, प्रभाकर वाले यांचे निधन झाले. तेव्हा मोहरे यांनी घरजागेचा ताबा मिळण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला असता त्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागला होता. न्यायालयीन निकालानुसार घरजागेचा ताबा घेऊन तो मोहरे यांना देण्यासाठी न्यायालयातील बेलिफ मंडळी पोलीस बंदोबस्तासह आली होती.
घरजागेचा ताबा जाणार, या विचाराने अस्वस्थ झालेल्या स्वप्नील वाले याने घरजागेच्या ताब्यासाठी पंधरा दिवसांची मुदत मागितली. त्यावरून वाद झाला असता स्वप्नील याने घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन ‘शोले’ चित्रपटातील ‘विरू’स्टाईल आंदोलन केले. बळजबरीने घरजागेचा ताबा घेतल्यास उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली. तेव्हा पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. परंतु अखेर स्वप्नील याने निराश होऊन दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यात त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली. त्यास ताब्यात घेऊन छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल झाला आहे.