निलंबनानंतर पूर्ववत सेवेत घेऊन माजलगाव तालुक्यात नियुक्ती दिलेल्या संगीता चाटे या शिक्षिकेने ७ महिन्यांचा पगार मिळावा, या साठी थेट जि. प. शिक्षण विभागात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी शिक्षिकेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी रुग्णालयात भेट देऊन चौकशी केली. काही दिवसांपूर्वीच अतिरिक्त शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा शिक्षिकेने विष घेतल्याने यंत्रणा सर्द झाली आहे. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला.
जि. प.च्या प्राथमिक विभागात अंबाजोगाई तालुक्यात शिक्षिका म्हणून कार्यरत संगीता बंकटराव चाटे यांनी काही महिन्यांपूर्वी तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी गेल्या ऑगस्टमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षिका चाटे यांना सेवेतून निलंबित केले होते. सात महिन्यांपूर्वी चाटे यांना पूर्ववत सेवेत घेऊन माजलगावच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात नियुक्ती देण्यात आली. मात्र, त्यांना शाळा मिळाली नाही. त्यामुळे ७ महिन्यांपासून त्यांचा पगार निघत नसल्याने त्यांनी जि. प. शिक्षण विभागाकडे पगारासाठी तगादा लावला होता. त्यांना माजलगाव तालुक्यातून अंबाजोगाईला बदली पाहिजे होती. तशी मागणीही त्यांनी केली होती.
सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शिक्षिका चाटे यांनी शिक्षण विभागात आल्यानंतर जवळील विषारी औषध प्राशन केले. या वेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माहिती मिळताच मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन शिक्षिकेच्या प्रकृतीची चौकशी केली. पंधरा दिवसांपूर्वीच घडलेल्या एका प्रकारात अतिरिक्त ठरलेल्या हिरामन भंडाणे या शिक्षकाने पगारासाठी उपोषण सुरू असताना खासगी रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. पगारासाठी शिक्षकाने आत्महत्या केल्याने राज्यभर खळबळ उडाली. जिल्हा परिषदेत जवळपास साडेसातशे शिक्षक विविध कारणांनी अतिरिक्त ठरले आहेत. शासन स्तरावरून संच मान्यतेला विलंब होत असल्याने आणि ऑनलाईन प्रणालीशिवाय वेतन निघत नसल्याने अतिरिक्त ठरलेले शिक्षक वर्षभरापासून पगाराविना काम करीत आहेत. अतिरिक्त शिक्षकाच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या शिक्षिकेने विष घेतल्याने प्रशासकीय यंत्रणा गडबडून गेली आहे.
रुजू न झाल्यामुळे पगार थांबला- सानप
संगीता चाटे यांना निलंबनानंतर ७ महिन्यांपूर्वी सेवेत पूर्ववत घेण्यात आले. अंबाजोगाईहून त्यांची माजलगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली. तालुकास्तरावर रुजू झाल्यानंतर त्यांना शाळा देण्याचे आदेश होते. मात्र, सेवेत पूर्ववत घेतल्यानंतर आपल्याला अंबाजोगाई तालुक्यातच नियुक्ती द्यावी, अशी त्यांची मागणी होती. परिणामी चाटे या माजलगाव येथे रुजूच न झाल्याने गटशिक्षणाधिकारी कार्यालयातून त्यांना शाळा मिळाली नाही. त्यामुळे त्यांचा पगार थांबला गेला, अशी माहिती शिक्षणाधिकारी सुखदेव सानप यांनी दिली.