News Flash

क्षयरोगाने त्रस्त रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुलाचा उपचारांसाठी मदत मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात विषारी द्रव्य प्राशन

मुलाचा उपचारांसाठी मदत मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात विषारी द्रव्य प्राशन

पालघर :  घराचे भाडे थकले, खायला अन्न नाही, स्वत: व मुलासाठी औषधोपचारासाठी पैसे नाहीत..त्यात क्षयरोग असल्याने नोकरी मिळत नाही व मदतही कोणी करीत नाही, अशा परिस्थितीत अडकलेल्या एकाने मंगळवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातच रासायनिक विषारी द्रव्य (फिनाइल) पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

सोमनाथ मुरलीधर चौधरी असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या रुग्णाचे नाव आहे. ते मंगळवारी आपली व्यथा जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडण्यासाठी आले होते, मात्र त्याची भेट न झाल्याने निराश होत त्यांनी हे पाऊल उचलले.

चार वर्षांपूर्वी सोमनाथ चौधरी व त्यांची पत्नी मुंबईतील प्रसिद्ध कोकिळाबेन रुग्णालयात काम करीत होते. मात्र त्यानंतर दोघांनाही क्षयरोग असल्याचे निदान झाल्यानंतर दोघांनाही नोकरीवरून कमी करण्यात आले. तिथून सोमनाथ यांच्या संसाराला उतरती कळा लागली. त्यातच सहा वर्षांचा त्यांचा मुलगा विश्वनाथ याला मूत्रपिंडाचा आजार बळावला आहे. त्याचा उपचार करायचा कसा असा प्रश्न सोमनाथ यांच्यासमोर होता, पत्नीचा क्षयरोग तीव्र झाल्यानंतर गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्यानंतर सोमनाथ यांनी त्याचा मुलगा विश्वनाथ याला कल्याण येथील एका अनाथाश्रमात दाखल केले. स्वत:ला क्षयरोग असल्यामुळे कोणीही काम देत नव्हते. तसेच या आजारपणात काम करणेही शक्य नव्हते. त्यामुळे सोमनाथ यांची घरची परिस्थिती खूपच बिकट झाली होती. दरम्यान मदतीसाठी त्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली होती व परिस्थितीने खंगल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे यापूर्वीही त्यांनी पत्र जिल्हाधिकारी कार्यालय व वसई विरार महानगरपालिका कार्यालयाला दिले होते, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर हे प्रकरण काही काळ शांत झाले.

सोमनाथ यांना काही सामाजिक संस्था तसेच वसईतील चर्चमधून उदरनिर्वाहासाठी मदत होत होती. दरम्यानच्या काळात सोमनाथ यांची प्रकृती खूपच खालावत गेली. त्यात त्यांच्या मुलाला आजार असल्याने त्याचा उपचार करायचा कसा असा प्रश्न त्यांना भेडसावू लागला व उदरनिर्वाहासाठी सुरू असलेली मदत अचानक थांबल्यामुळे पुन्हा त्यांनी प्रशासनाकडे मदतीचा धाव घेतली. मंगळवारी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यांगतांना अधिकारी वर्गाला भेटण्याची परवानगी नसल्याने सोमनाथ यांना आपली व्यथा जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडता आली नाही. त्यामुळे आपले येणे व्यर्थ गेले व आता आपल्याला मदत मिळणार नाही या विचाराने त्यांनी त्यांच्याजवळ बाळगलेल्या रासायनिक विषारी द्रव्याची बाटली जिल्हाधिकारी कार्यालयातच प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ग्रामीण रुग्णालयात सोमनाथ यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ ओढवली आहे. मुलाला मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासले आहे व स्वत: क्षयरोगी असल्याने हाताला कोणीच काम देत नाही. प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून मदत मिळाली नाही. शेवटी मरण हाच पर्याय समोर दिसल्याने तो मी स्वीकारला.

सोमनाथ चौधरी, क्षयरुग्ण, वसई

संबंधितास मदत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. वसई-विरार मनपा क्षेत्राचा रहिवासी असल्याने पालिकेला या प्रकरणात लक्ष देण्यात कळवीत आहोत.

किरण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 12:48 am

Web Title: tuberculosis patient attempted suicide zws 70
Next Stories
1 अत्यवस्थ रुग्णांची तडफड
2 मिरजेजवळ ऐतिहासिक विहिरीमध्ये पेशवेकालीन शिलालेख
3 करोनाचे प्रमाण कमी करणारा ‘अमरावती पॅटर्न’ यशस्वी
Just Now!
X