गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असणाऱ्या तूर खरेदीची कोंडी अजूनही सुटलेली नाही. २५ मार्चपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव मार्केटयार्डात तूर विक्रीसाठी घेऊन आलेला शेतकरी मोंढय़ात मुक्कामी आहे. ५ एप्रिलपासून नाफेडची तूर खरेदी सुरू होणार होती. मात्र, खरेदीला अद्याप मुहूर्त सापडला नाही. अशातच १ ते २५ मार्चदरम्यान ज्यांची तूर खरेदी झाली, त्यांची देयकेही लटकलेलीच आहेत.  जवळा बाजार येथील बाजार समितीत गेल्या महिनाभरापासून नाफेडची तूर खरेदी बंद आहे. खरेदी तत्काळ सुरू न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा बाजार समितीचे सभापती अंकुशराव आहेर यांनी  दिला आहे.

आतापर्यंत २७ हजार १२५.७७ िक्वटल तूर खरेदी केल्याची नोंद आहे.  २५ मार्च पूर्वीच्या तूर विक्री केलेल्या  ६०० शेतकऱ्यांना अद्याप धनादेश वाटप झाले नाहीत. आजही मार्केटयार्डात ३० ते ४० शेतकऱ्यांचा माल पडून आहे.  ५ एप्रिलपासून तूर खरेदी केली जाणार असल्याची सूचना लावण्यात आली होती. परंतु बुधवारी तूर खरेदीला प्रारंभ झाला नाही. या संदर्भात नाफेडच्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधला असता ‘ग्रेडर’ला मारहाण झाली होती. तो बुधवारी कामावर आला नसल्यामुळे तूर खरेदी बंद आहे. ग्रेडर आल्यानंतरच तूर खरेदी सुरू होईल, असे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलतांना सांगितले. वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटयार्डात तूर खरेदीसाठी बारदाना उपलब्ध नसल्याने सुमारे दीड ते दोन हजार िक्वटल माल खरेदीविना पडून आहे. जवळा बाजार येथील बाजार समितीच्या मार्केटयार्डात व्यापाऱ्यांचीच तूर नाफेडकडून खरेदी होत असल्याने खुद्द बाजार समितीचे सभापती अंकुशराव आहेर यांनी तक्रार केली होती. नाफेड तूर खरेदी केंद्र बंद असल्याने गरजू शेतकऱ्यांना तुरीचा माल विकल्याशिवाय गत्यंतर नसल्याने बुधवारी नवामोंढा येथे शेतकऱ्यांनी पाच ते सहा हजार िक्वटल तूूर विक्रीसाठी मोंढय़ात टाकली होती. सुरुवातीला वेळेत लिलाव सुरू होत नसल्याने वाद निर्माण झाला असता बाजार समितीचे सचिव जब्बार पटेल यांनी तात्काळ तो वाद निकाली काढून लिलावाचे काम सुरू केले. बुधवारी खाजगी व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या तुरीला ४ हजार ते ४ हजार ३०० पर्यंत प्रति िक्वटल भाव होता.