प्रकाश टाकळकर

यंदा विक्रमी पावसामुळे निळवंडे धरणात आजपर्यंत धरण क्षमतेच्या सुमारे साडेतीन पट पाणी आले. आढळा व भंडारदरा धरणातही अशाच प्रकारे मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. जायकवाडीला वीस टीएमसीपेक्षा जास्त पाणी वाहून गेले.

भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी व घाटघर येथे सात हजार मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. या पावसाने तालुक्यातील खरीप पिकांची मात्र वाताहत झाली.

जूनच्या अखेरीस पडता झालेला पाऊस नोव्हेंबर सुरू झाला तरी अद्याप कमी अधिक प्रमाणात तालुक्यात कोठे ना कोठे पडतच आहे. सह्यद्रीच्या पर्वतरांगांतील तालुक्याचा पूर्व भागातही या वर्षी सरासरीच्या दुप्पट ,तिप्पट पाऊस पडला. रतनवाडी येथे ७ हजार १९४ मिमी इतक्या  विक्रमी पावसाची नोंद झाली. तर घाटघर येथेही ७ हजार ५५ मिमी पाऊस पडला. दोन पर्जन्यमान केंद्रावर ७ हजार मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ होय.

भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील या पावसामुळे धरणात या वर्षी २५ टीएमसी म्हणजे धरण क्षमतेच्या सव्वादोन पटीपेक्षा अधिक नवीन पाण्याची आवक झाली. यातील ११ टीएमसी पाणी धरणात अडविण्यात आले. तर १४ टीएमसी सोडून दिले गेले. निळवंडे धरणात तर क्षमतेच्या साडेतीन पट नवीन पाणी जमा झाले. धरणाची क्षमता ८.३२ टीएमसी असून धरणात सुमारे साडेअठ्ठावीस टीएमसी पाणी आले. १ हजार ६० दलगफूट क्षमतेच्या आढळा धरणातही क्षमतेच्या तिप्पट म्हणजे ३ हजार २६४ दलगफूट पाणी जमा झाले.

जिल्ह्यतील सर्वात मोठय़ा मुळा धरणात या वर्षी आजपर्यंत ३३ टीएमसी नवीन पाणी आले आहे. हे पाणी मुख्यत: अकोले तालुक्यात पडलेल्या पावसाचे आहे.

पूर्व भागातही यंदा विक्रमी पाऊस पडला. अकोल्यात सरासरीच्या दुप्पट तर एरवी जेमतेम पाऊस पडणाऱ्या आढळा धारणस्थळावर दुप्पट पाऊस पडला.

या पावसामुळे तालुक्यातील शेती पिकांची मात्र वाट लागली. सुरुवातीच्या चांगल्या पावसामुळे  खरीप पिकांची स्थिती समाधानकारक होती. मात्र ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.

पिकांचे नुकसान

काढून ठेवलेल्या बाजरी, सोयाबीनला मोड आले. कणसे खराब झाली. शेतातील लाल कांदा सडू लागला. कांदा रोपे कुजली. डाळिंब, द्राक्ष बागांनाही अति पावसाचा फटका बसला. भाजीपाला पिकांचीही वाट लागली. पश्चिम भागात भात सोडून अन्य खरीप पिके पूर्वीच हातची गेली होती. उशिराच्या पावसाने भाताचेही अतोनात नुकसान झाले. खरीप हंगाम पूर्णपणे हातचा गेला. अजूनही सुरू असणारा पाऊस आणि ठिकठिकाणी शेतात साठलेले पाणी यामुळे रब्बीच्या पेरण्यांनाही उशीर होणार आहे.