उत्तमनगर परिसरात दुषित पाणी पिल्यामुळे आदिवासी महिलेसह दोन मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर वैद्यकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. अन्य दोन बालकांना चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लोमटे यांनी दिली. उत्तमनगर परिसरात आदिवासी वन विभागाच्या अतिक्रमित शेतात राहणाऱ्या सुमारी प्यारसिंग बारेला (२२) या विवाहित महिलेने शेतातील नाल्याचे पाणी प्यायले. त्यामुळे त्यांना उलटय़ा व जुलाबचा त्रास झाला. गावात डॉक्टर अथवा वैद्यकीय सुविधा नसल्याने उपचाराविना सुमारीबाईचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर या महिलेचा दिड वर्षांचा मुलगा आमलेशचाही मृत्यू झाला. दोन्ही मायलेकांचा गॅस्ट्रोमुळे मृत्यू झाला. तसेच याच कुटुंबातील मुलगी नानली (७ महिने) ही न्युमोनियाने दगावली आहे. अन्य दोन बालकांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर, वैद्यकीय पथक परिसरात तळ ठोकून आहे. एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती उपचाराअभावी दगावल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. आर. पाटील यांनी भेट देऊन कुटुंबाची चौकशी केली. वैद्यकीय पथकाने शुध्द केलेले पाणी गावात वितरित करण्यात येत आहे.