जिल्हय़ातील तळोदा तालुक्यातील प्रतापपूर प्राथमिक आरोग्य केंद्राची संरक्षक भिंत कोसळून दोन बालक ठार तर एक गंभीर जखमी झाला. वादळी वाऱ्यामुळे ही भिंत कोसळली.
तळोदा तालुक्यातील प्रतापपूर प्राथमिक आरोग्य केंद्राची कर्मचारी निवासाच्या पाठीमागील भिंतीचा कोपरा वाऱ्यामुळे कोसळला. भिंतीच्या आडोशाला एकाच कुटुंबातील पाच मुले खेळत होती. भिंतीखाली ते दाबले गेले. त्यात प्रवीण ठाकरे (३) हा जागीच मरण पावला, तर जखमी वसंत दिलीप ठाकरे (७) आणि संगीता ठाकरे (९) हे गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी वाहनातून तातडीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर दोघा जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
रस्त्यातच संगीता ठाकरे हिचे निधन झाले. या घटनेची माहिती समजल्यानंतर तहसीलदार मुकेश चव्हाण यांनी भेट दिली.