विनोद अग्रवाल आणि महेश बालदी या दोन अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आता भाजपाचं संख्याबळ १०५ वरुन १०७ झालं आहे. निवडणूक निकालाच्या दिवशी भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. त्यानंतर चारजणांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने त्यांचं संख्याबळ ६० झालं आहे. तर भाजपाला आता २ अपक्ष आमदारांचं बळ लाभल्याने भाजपाचं संख्याबळ १०७ झालं आहे.

 

जनतेने निवडणूक निकालात जो कौल दिला तो महायुतीच्या बाजूने आहे. मात्र अब की बार २२० के पार हे काही प्रत्यक्षात आलेलं नाही. भाजपाने मित्रपक्षांसह १६४ जागांवर तर शिवसेनेने १२४ जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र शरद पवार यांनी विरोधीपक्षाला त्यांच्या रुपाने जो चेहरा दिला आणि ज्या प्रमाणात सभा घेतल्या त्याचा परिणाम मतदानावर झाला. भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या जागा २०१४ च्या तुलनेत कमी झाल्या. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या.

शनिवारी मुंबईत मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत समसमान फॉर्म्युल्यानुसार अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं आणि तसं आश्वासन लेखी स्वरुपात घ्यावं अशी मागणी करण्यात आली. सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आधी दिवाकर रावते आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भेटही चर्चेचा विषय ठरली. आता सत्तास्थापनेचा पेच कसा सुटणार हे लवकरच स्पष्ट होईल तूर्तास दोन्ही पक्ष आपल्या बाजूने कोणाला वळवता येईल याच्या प्रयत्नात आहेत.