जिल्ह्य़ातील काही भागात शनिवारी वादळ वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. येवला तालुक्यात वीज कोसळून दोन जण ठार झाले तर इगतपुरी तालुक्यात दोन मुली जखमी झाल्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसामुळे सिंहस्थाच्या कामांवर विपरित परिणाम झाला आहे.
मागील दोन ते तीन दिवसांपासून बहुतांश भागात ढगाळ हवामान आहे. यामुळे उकाडा काहिसा कमी झाला होता. शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, येवल्यातील काही भाग, नाशिक शहर व परिसर आदी ठिकाणी त्याने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. येवला तालुक्यातील महालखेडा येथे शेतातील झोपडीवर वीज कोसळून
गौरी श्रावण वाघमारे (३५) आणि टिटव काशिनाथ वाल्हेकर (४०) हे शेतमजूर ठार झाले. तर निखील लक्ष्मण वाल्हेकर (१०) हा मुलगा जखमी झाला. इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. मांजरगाव येथील अंकुश गभाले (१५) आणि स्वाती भमा गभाले (१५) या मुली शेळ्या चारण्यासाठी खेड भैरव परिसरात गेल्या होत्या. अचानक पाऊस सुरू झाल्याने त्यांनी झाडाखाली धाव घेतली. शेळ्याही झाडाखाली येऊन थांबल्या. याच झाडावर वीज कोसळल्याने नऊ शेळ्या जागीच ठार झाल्या तर दोन्ही मुली जखमी झाल्या. त्यांना घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने तासभर झोडपून काढले. या ठिकाणी सिंहस्थांची अनेक कामे अंतिम टप्प्यात आहे. पावसाचा फटका त्यांना सहन करावा लागणार असल्याचे दिसत आहे.