राज्यातील निवडणुकानंतर काँग्रेसने शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार या चर्चेने जाेर धरला आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाही समावेश मंत्रिमंडळात करण्यात आल्यानं त्यांच नाव स्पर्धेतून बाहेर पडलं असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री सतीश चर्तुवेदी यांची नावे स्पर्धेत आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर तत्कालिन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. काँग्रेसला ४४ जागांवर विजय मिळाला होता.

निकालानंतर भाजपा-शिवसेनेतील वाद विकोपाला गेला. त्यात शिवसेनेने सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेससमोर हात पुढे केला होता. यात बाळासाहेब थोरात यांची महत्त्वाची भूमिका होती. सरकार स्थापन झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी नव्या नेतृत्त्वाचा शोध सुरू आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. सध्या प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे. चव्हाण यांच्या पाठीशी केंद्रातील अनुभव असून, राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तर दुसरीकडे आता विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी माजी मंत्री सतीश चर्तुवेदी यांचेही नाव हायकमांडकडे पाठवले आहे. देशभरात काँग्रेसची पिछेहाट होत असताना विदर्भाने पक्षाला हात दिला आहे. त्यामुळे विदर्भाला केंद्रित करून देशभरात पुन्हा काँग्रेसला सक्षम करायचे असेल तर प्रदेशाध्यक्षपद विदर्भात द्यावे, अशी मागणी सरकारमधील काही वरिष्ठ नेत्यांनीही केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात काँग्रेस हायकमांडकडून निर्णय होईल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.