चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र झाला असून सिंदेवाही वनपरिक्षेत्र अतर्गत येत असलेल्या पवनपार येथे वाघाने एकाच परीवारातील दोन व्यक्तींवर हल्ला करत ठार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

कमलाकर उंदीरवाडे आणि दूरवास धानू उंदीरवाडे अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. दोघेही जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेले होते. सदर घटना पवनपार ते खैरी या मार्गावर पवनपार गावाजवळ घडली.

सध्या मोहफूल गोळा करण्याचे काम पवनपार परिसरात जोमाने सुरू आहे. गावात काम नाही त्यामुळे मोहफुल गोळा करून कित्येक कुटुंब आपली उपजिविका चालवतात. सकाळी पवनपार येथील नागरिक मोहफूल गोळा करायला गेले होते. मृत व्यक्ती गावालगतच मोहफूल गोळा करत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने दोघांवरही एकामागून एक हल्ला केला. ते जागीच गतप्राण झाले.

या घटनेमुळे पवनपार गावात व परीसरात भीतीची दहशत पसरली आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे. माहिती मिळताच वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.