आपण हाणामारीच्या अनेक घटना आजवर पाहिल्या असतील. परंतु नुकतीच दोन पोलिसांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. भंडाऱ्यातील एका रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आरोपींना घेऊन गेलेल्या पोलिसांमध्येच हाणामारी झाल्याचा प्रकार सोमवारी घडला. आरोपींना खर्रा देण्याववरून दोघांमध्ये वाद झाला. परंतु पोलिसांमध्येच सुरू असलेल्या वादाचा व्हिडीओ नंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

सोमवारी सकाळी हे दोन्ही पोलीस आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेले होते. तपासणीनंतर आरोपीला परत आणताना दोन्ही पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर दोन्ही पोलिसांनी एकमेकांना शिविगाळ करत आपल्या पायातील बूट काढून मारहाण करण्यास सुरूवात केली. दरम्यान, त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्ही पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याचा व्हिडीओ काढला. त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानं ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचली.

दरम्यान, पोलिसांची प्रतीमा मलिन करण्याचा ठपका ठेवत या पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी संबंधित पोलिसांवर कारवाई केली. विकास गायकवाड, निलेश खडसे, विष्णू खेडीकर आणि मनोज अंबादे अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत.