अहमदनगर जिल्ह्यातील निंबोडी गावातील जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळून ढिगाऱ्याखाली २० ते २५ विद्यार्थी दबले गेले आहेत. या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे. ही घटना सांयकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान घडली. या घटनेत ३ ते ४ मुले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर शहरातील सिव्हिल रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून निंबोडी येथे पाऊस पडत आहे. जिल्हा परिषद शाळेतील काही वर्ग हे जीर्ण झाले आहेत. सततच्या पावसामुळे पाचवीच्या वर्गातील छत कोसळले. या वेळी वर्गात २५ ते ३० मुले होते. बचावकार्य सुरू असून मुलांना बाहेर काढण्याचे काम केले जात असल्याचे सांगण्यात येते. अनेकांच्या डोक्याला व पायाला मार लागला आहे. श्रेयस रहाणे व वैशाली पोटे असे मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. शाळेच्या परिसरात पालकांची मोठी गर्दी झाली आहे. जेसीबीच्या सहाय्याने राडारोडा काढला जात आहे. पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे. प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था कार्यरत करण्यात आली आहे. या दुर्घटनेत एक शिक्षकही जखमी असल्याचे समजते.