काश्मीरच्या बांदिपोरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. मात्र दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना दोन जवानांना वीरमरण आले. यामध्ये महाराष्ट्राच्या एका जवानाचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री गावाचे रहिवासी असलेल्या मिलिंद खैरनार यांना दहशतवाद्यांशी लढताना हौतात्म्य आले आहे. खैरनार हवाई दलाच्या ‘गरुड’ या विशेष पथकात कार्यरत होते. खैरनार यांच्यासह निलेश कुमार नायर यांनादेखील दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले.

बांदिपोरामधील हाजिन भागात पहाटे पावणे पाचपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु होती. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. यावेळी एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. काल (मंगळवारी) श्रीनगरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. मात्र सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. ‘सीआरपीएफ’च्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी मारला गेला. याआधी सोमवारी बडगाममधील दहशतवाद्यांविरुद्धच्या चकमकीत भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याला वीरमरण आले. लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना सर्व बाजूंनी घेरल्यावर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला. यामध्ये सुभेदार राज कुमार गंभीर जखमी झाले होते. यानंतर काही वेळाने त्यांनी प्राण सोडला.