माणूस स्मार्ट फोन वापरू लागला, टेक्नोसॅव्ही झाला तरीही अंधश्रद्धेने त्याची पाठ सोडलेली नाही. याचेच उदाहरण चंद्रपुरात समोर आले आहे. केसांमध्ये तीन भोवरे असलेल्या २ वर्षांच्या युग मेश्रामचा गुप्तधनाच्या लालसेतून बळी देण्यात आला. त्याच्या शेजारी राहणाऱ्या तांत्रिकानेच युगचा बळी दिला. या प्रकरणी पोलिसांनी सुनील बनकर आणि प्रमोद बनकर या दोघांनाही अटक केली.

२२ ऑगस्टला युग मेश्राम त्याच्या घराशेजारी खेळताना गायब झाला होता. युग मेश्रामच्या घराशेजारीच बुधवारी (२९ ऑगस्ट) त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी युगला शोधण्यासाठी तीन पथके नियुक्त केली होती. मात्र बुधवारी पोलिसांना युगचा मृतदेह सापडला. याप्रकरणी पोलिसांनी ४ संशयितांना ताब्यात घेतले होते. अखेर युग मेश्रामचा गुप्तधनाच्या लालसेतून बळी दिल्याचे प्रमोद आणि सुनील बनकर यांनी कबूल केले असे पोलिसांनी म्हटले आहे. घरासमोर खेळणाऱ्या युगला चॉकलेटचे आमिष दाखवून आरोपी त्याला घेऊन गेले होते. त्यानंतर युगची पूजा करून त्याची हत्या करण्यात आली. चंद्रपूरमध्ये भानामती करणी यांसारखे प्रकार याआधीही उघडकीस आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात असलेल्या खंडाळा येथून युग मेश्राम गायब झाला होता. गुप्तधनासाठी त्याचा बळी देण्यात आला. २२ ऑगस्टला युग त्याचा मोठा भाऊ हर्षल सोबत खेळत होता. तो घरी परतलाच नाही, आता त्याचा मृतदेह सापडला आहे. त्याच्या मृतदेहावर खुणा होत्या असेही स्पष्ट झाले आहे. २३ ऑगस्टला युगचा बळी देण्यात आला त्यानंतर मृतदेह नदीत फेकण्याचे आरोपींनी ठरवले होते. मात्र दिवस उजाडल्यामुळे आणि गावात वर्दळ वाढल्याने युगचा मृतदेह तणसाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवल्याचेही आरोपींनी मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.