रवींद्र केसकर

एखाद्याच्या मृत्यूविषयी संशय असेल तर त्याच्या काही अवयवांचे नमुने (व्हिसेरा) काढून ते न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले जातात. या प्रयोगशाळेचा अहवाल भारतीय पुरावा अधिनियमानुसार महत्त्वाचा मानला जातो. मृताच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यास पोलीस विभागाला मदत होते. मात्र, मागील दोन वर्षांपासून उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात तब्बल १७५ मृतांच्या अवयवांचे नमुने तपासणीअभावी पडून आहेत. त्यातील अनेक अवयव सडल्यामुळे मोठी दुर्गंधी सुटली आहे. रुग्णालय प्रशासनाने हे अवयव नष्ट करण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी मागितली आहे. मात्र त्यांना अद्यापही परवानगी मिळालेली नाही.

एखाद्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजले नाही किंवा संशयित मृत्यू असल्यास त्याची उत्तरीय तपासणी केली जाते. मृत व्यक्तीचे जठर, फुफ्फुस, आतडे आदी अवयव रासायनिक तपासणीकरिता काढून ते विशिष्ट रसायनाच्या बंद बाटलीत ठेवले जातात. अवयव काढल्यानंतर जास्तीत जास्त तीन महिन्यांपर्यंत त्याच्या तपासणीतून काहीतरी निष्पन्न होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व्हिसेरा म्हणजेच मृतांच्या अवयवाचे नमुने न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यासाठी बाजूला काढून सीलबंद केले जातात. हे नमुने वेळेत प्रयोगशाळेकडे न पाठविल्यास ते पूर्णपणे खराब होऊन जातात. उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात मागील दोन वर्षांपासून पावणे दोनशे मृतांचे व्हिसेरा पडून आहेत. जिल्ह्यतील १७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील २०१८ सालापासून झालेल्या संशयास्पद मृत्यूमधील मृतांवर पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तपासणी अहवालाअभावी ताटकळत राहण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे.

भारतीय पुरावा अधिनियमानुसार व्हिसेराचा अहवाल महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्रा धरला जातो. एखादी व्यक्ती शुध्दीत नसल्यामुळे त्यास जिवे मारण्याच्या वेळी त्याने प्रतिकार केला होता की नाही?, हुंडाबळी प्रकारात औषध देऊन बेशुध्द केले आणि त्यानंतर पेटवून दिले आहे काय? अशा अनेक बाबी या अहवालातून समोर येतात. व्हिसेरा काढल्यानंतर त्याच्या सडण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. तो सडू नये याकरिता त्याला रासायनिक द्रव्यात ठेवले जाते. मात्र निर्धारित वेळेत तपासणीसाठी तो न दिल्यास नंतर तपासणीत काहीच निष्पन्न होत नाही. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दोन वर्षांपासून १७५ मृतांचे व्हिसेरा तपासणीची वाट पाहात पडून आहेत.

दोन वर्षांपासून अनेक मृतांच्या अवयवाचे नमुने न्यायवैद्यक विभागाकडे पाठविण्याअभावी पडून आहेत. सुमारे दोनशेच्या घरात ही संख्या असण्याची शक्यता आहे. कालबा व्हिसेरा नष्ट करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडे अधिकृत परवानगी मागितली आहे. पोलीस प्रशासनाकडून तशी परवानगी मिळताच ते नष्ट करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.