“या जन्मातलं याच जन्मात फेडावं लागतं दुसरं काय?” असं म्हणत भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. खरंतर उदयनराजे भोसले हे शरद पवारांना आपण कायम गुरुस्थानी मानतो. राष्ट्रवादी सोडल्यावरही शरद पवार हे मला वडिलांसारखेच आहेत असं म्हणणाऱ्या उदयनराजेंनी अचानक शरद पवार यांना टोला लगावला. दोन दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांना पवारांच्या आठवणी सांगताना अश्रू अनावर झाले होते. एवढंच नाही तर शरद पवार जर सातारा पोटनिवडणूक लढवणार असतील तर मी निवडणूक लढवणार नाही असंही त्यांनी म्हटलं होतं. असं असूनही उदयनराजे यांनी दिलेली प्रतिक्रिया चकीत करणारी आहे असंही बोललं जातं आहे.

शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीने शरद पवारांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर उदयनराजे यांनी ही प्रतिक्रिया दिली. ईडीच्या कार्यालयात आपण स्वतः जाऊन सहकार्य करु असं शरद पवार यांनी २४ तारखेच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यानंतर आज शरद पवार यांच्या समर्थनासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते आले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि ईडीने तुम्ही कार्यालयात येण्याची गरज नाही तुम्हाला पूर्वकल्पना देऊ असं सांगितलं ज्यामुळे हा ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब करण्यात आला. दरम्यान या सगळ्याबाबत बोलताना उदयनराजे यांनी या जन्मी केलं ते याच जन्मी फेडावं लागतं असा टोला उदयनराजे यांनी लगावला आहे.