अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणामध्ये पाटणा पोलिसांकडे सुशांतच्या वडीलांनी दाखल केलेली तक्रार ही ग्राह्य धरून बिहार पोलिसांनी चौकशी न करता या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांना करु देण्यात यावी यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र या सुनावणीदम्यान महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयामध्ये झाल्याचा दावा भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केला आहे. त्यामुळेच आता या प्रकरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागणार आहे असं वक्तव्य निलेश राणे यांनी केलं आहे.

नक्की वाचा >> “सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी आदित्य आणि राऊत यांची नार्को टेस्ट करा सगळं सत्य समोर येईल”

निलेश राणे यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये आले, की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केस मध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे,” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. मागील काही दिवसांपासून या प्रकरणाशी आदित्य यांचा संबंध असल्याचा दावा करणारे अनेक तर्कवितर्क सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्याचे पहायला मिळत आहे.

मात्र या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी एका वृत्तावाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं आहे.  “आदित्य ठाकरेंचा या सर्व प्रकरणाशी काय संबंध? हिंमत असेल तर भाजपाच्या लोकांना जाहीरपणे त्यांचं नाव घ्यावं. ते चांगलं काम करत आहेत, मदत करत आहेत. बदनामी करण्याची मोहीम सुरु असून हे चांगलं राजकारण नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयामध्ये काय घडलं?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालाचा पाटण्यातील कुठल्याही गुन्ह्य़ाशी किंवा घटनेशी संबंध नाही, असा युक्तिवाद सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केला. न्या. हृषीकेश रॉय यांच्या नेतृत्वाखालील पीठास रियाचे वकील श्याम दिवाण यांनी सांगितले, की यात राज्याने मोठा हस्तक्षेप केला असून चौकशीत प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पक्षपातीपणाचा धोका निर्माण झाला आहे. या सगळ्या प्रकरणातील घटनाक्रमांची आठवण देऊन त्यांनी सांगितले, की सुशांतच्या वडिलांनी त्याचा मृत्यू झाल्यानंतर २८ दिवसांनी म्हणजे खूप विलंबाने प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला आहे. त्या प्राथमिक अहवालात जो तपशील दिला आहे तो मुंबईतील घटनांशी संबंधित आहे, असंही दिवाण यांनी आपल्या युक्तीवादामध्ये म्हटलं आहे.

आदित्य आणि राऊत यांच्या सीबीआय चौकशी मागणी

बिहार भाजपाचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी काही दिवसांपूर्वी सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये सुशांत सिंह मृत्यूप्रकरणामध्ये सीबीआयने आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची चौकशी करावी अशी मागणी केली होती. इतकचं नाही तर आनंद यांनी राऊत आणि आदित्य यांनी नार्को टेस्ट करण्याचीही मागणी केली आहे. भाजपाचे अधिकृत प्रवक्ते असणाऱ्या आनंद यांनी या प्रकरणाशी संबंधित पुरावे आणि साक्षीदारांमध्ये या दोघांनी आफरातफर केल्याचा आरोपही केला आहे.