09 August 2020

News Flash

उद्धव ठाकरे बिनखात्याचे मुख्यमंत्री; इतिहासात नोंद होईल

माजीमंत्री बबनराव लोणीकर यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

(संग्रहित छायाचित्र)

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी खाते वाटप करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकही खाते स्वत:कडे ठेवले नाही. त्यामुळे राज्याच्या इतिहासात त्यांचे नाव बिनखात्याचे मुख्यमंत्री म्हणून नोंदले जाईल, अशी टीका माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे. भाजपच्या जिल्ह्य़ातील मंठा तालुका अध्यक्षांची निवड झाल्यावर पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलताना लोणीकर यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

लोणीकर म्हणाले, ‘‘सध्याची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करत आहे. केवळ सत्तेच्या लालसेपोटी राज्यातील उद्धव ठाकरे यांचे सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तालावर नाचत आहे. बाळासाहेब ठाकरे यांना जनतेने हिंदुहृदयसम्राट ही पदवी बहाल केलेली आहे. परंतु त्यांच्यासमोरची ही पदवी काढून टाकण्याचे काम त्यांच्याच मुलाकडून व्हावे, ही बाब दुर्दैवी आहे. शिवसेनेने लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकास पाठिंबा दिला. परंतु त्यानंतर सोनिया आणि राहुल गांधी यांनी फटकारल्यानंतर शिवसेनेने घुमजाव करून राज्यसभेत या विधेयकास विरोध करून पळून जाणे पसंत केले. शिवसेनेचा वाघ आता वाघ राहिलेला नसून वाघाचे रुपांतर आता काँग्रेसच्या शेळीत झालेले आहे.

सर्व जाती-धर्मास प्राधान्य देणाऱ्या भाजपने जातीपेक्षा कर्तृत्वास मोठे करण्याचे काम केले. भाजप इतर मागासवर्गीयांना प्राधान्य देत नाही, अशी ओरड विरोधक नेहमीच करताना दिसतात. इतर मागासवर्गीयांना भाजपपासून वेगळे करण्याच हा विरोधकांचा डाव आहे.

सध्याचे सरकार स्थगिती सरकार आहे. आधीच्या सरकारने घेतलेल्या अनेक चांगल्या आणि जनहिताच्या योजनांना नवीन सरकारने स्थगिती देणे ही बाबही दुर्दैवी होय, असेही ते म्हणाले.

पराभवाचा दोष फडणवीसांवर नको

सलग दोनवेळेस विधानसभेत पक्षाच्या शंभरपेक्षा अधिक जागा निवडून आणण्याची किमया देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वामुळे झाली आहे. काही ठिकाणी पक्षाचा दुर्दैवी पराभव झाला असला तरी त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना दोषी ठरविण्याऐवजी आत्मपरीक्षणाची गरज आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदावर असताना नेहमीच विकासाचे राजकारण केले, असेही लोणीकर म्हणाले.

भाजपचे सरकार पुन्हा येईल

सध्याच्या सरकारवर टीकेची झोड उठविताना लालसेपोटी सत्तेवर आलेल्या या मंडळींचे विकासकामांना स्थगिती देण्याचे निर्णय जनतेस मान्य नसल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी स्वपक्षातील लोकप्रतिनिधींएवढा मान-सन्मान आणि विकासकामांचा निधी इतर पक्षांच्या मतदारसंघात दिला होता. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार पुन्हा येईल, असेही लोणीकर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2019 1:30 am

Web Title: uddhav thackeray bin cm history will be recorded abn 97
Next Stories
1 समृद्धी महामार्गाला विदर्भ-मराठवाडा नाव द्यावे -बोंडे
2 मुख्याध्यापकांच्या नावाने शाळा ओळखण्याची परंपरा गेली कुठे?
3 भाजपचे सावरकर प्रेम म्हणजे ढोंगीपणा – राऊत
Just Now!
X