शिवसेना दुष्काळग्रस्त शेतकऱयांसोबत असून तुम्ही आत्महत्या करणार नाही याचे वचन द्या, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सोमवारी केली. नांदेडमध्ये उध्दव यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
उध्दव ठाकरे म्हणाले की, “शिवसेनेचा हा दौरा म्हणजे ‘पीपली लाईव्ह’नाही. यापुढे कोणीही आत्महत्या करणार नाही, असे वचन द्या. आपल्या घराचा विचार करा, मुलाबाळांचा विचार करा, शिवसेना सदैव तुमच्या सोबत आहे.” उद्धव ठाकरे आपल्या ६३ आमदारांसह आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, ते सोमवारी  नांदेडमध्ये दाखल झाले आणि तेथील दुष्काळी परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर मंगळवारी ते जालन्याला रवाना होणार आहेत. ८ डिसेंबरपासून सुरु होणार्‍या अधिवेशानात फडणवीस सरकारला धारेवर धरण्‍याचा शिवसेनेचा विचार आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी मराठवाड्यातील दुष्काळाची स्थिती पाहून आकडेवारी गोळा करण्याचा शिवसेनाचा प्रयत्न सुरु असल्याचे समजते.