शिवसेना आणि भाजपा यांची युती झाल्यानंतर विरोधक टीकेची एकही संधी सोडत नाहीत. उद्धव ठाकरेंकडून संधीचं राजकारण करण्यात आलं पण राज ठाकरे हे संधीसाधू नाहीत असं म्हणत काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेवर टीकेचे बाण चालवले आहेत. मनसे महाआघाडीत समाविष्ट होणार का? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. युती झाल्यानंतर शिवसेनेबद्दल काय वाटतं असा प्रश्न मिलिंद देवरा यांना विचारण्यात आला होता. यानंतर शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? असा प्रश्न देवरा यांनी विचारला आहे.एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

तीन पेंग्विन, शिववडा या दोन गोष्टी सोडल्या तर मराठी माणसासाठी शिवसेनेने काहीही केलं नाही हे मराठी माणसालाही ठाऊक आहे. मिल कामगारांसाठीच्या मिल कोणी खरेदी केल्या? असाही प्रश्न देवरा यांनी विचारला. मुंबईतील भाडेकरूंसाठी काँग्रेस काम केल्याचा दावाही त्यांनी केला. शिवसेना आणि त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते यांच्यावर जनता नाराज आहे. याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरे संधीसाधू आहेत मात्र राज ठाकरे किमान संधीसाधू नाहीत. राज ठाकरे आणि आमच्या विचारधारेत फरक आहे, असंही देवरांनी स्पष्ट केलं नाही. महाआघाडीत मनसेला घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल आहे. मात्र काँग्रेसला हे मान्य होणार की नाही हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

शिवसेना आणि भाजपा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युती जाहीर केली आहे. यानंतर या दोन्ही पक्षांवर टीका होताना दिसते आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या दोन्ही पक्षांवर टीका करत या दोन्ही पक्षांना जनता पुन्हा निवडणार नाही असे म्हटले आहे. तर मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरेंना संधीसाधू म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.