शिवसेनेचा जन्मच शेतकऱ्यांच्या सेवेसाठीच झाला आहे. सत्तेमध्ये असून शिवसेना विरोधकांसारखी वागते अशी टीका आमच्यावर केली जाते. आम्ही सत्तेमध्ये जरूर मात्र आम्ही सामन्य माणसाचा आवाज म्हणून शिवसेनेत आहोत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आम्ही शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आमच्यात आणि आघाडीमध्ये फरक काय राहिला? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. शेतकऱ्यांना नडाल तर तुमची दुकानं बंद करून टाकू असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

गरज पडल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाईन असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी  औरंगाबादच्या लासूर येथील पीक विमा केंद्राला भेट दिली. त्यानंतर त्यांनी एक छोटेखानी भाषण केले. या भाषणात त्यांनी शिवसेना शेतकऱ्यांसोबत आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. विमा कंपन्यांनाही त्यानी सुनावले आहे, समोरच्या माणसाला जी भाषा कळते त्या भाषेत आम्हालाही उत्तर देता येते असा इशाराच त्यांनी दिला.

दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजला आहे. अनेक योजना इथल्या लोकांपर्यंत पोहचत नाही. शेतकरी जेव्हा अडचणीत तेव्हा त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे काम कायमच शिवसेनेने केले आहे. शेतकऱ्यांसाठीचे पैसे आम्ही बँकांना दिले आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते पैसे का मिळाले नाहीत हा माझा बँकाना सवाल आहे. आम्हाला ज्यांनी खुर्चीवर बसवले त्यांनाच आम्ही वाऱ्यावर सोडणार असू तर आम्हीही काँग्रेससारखेच होऊ मात्र आम्ही तसे होऊ देणार नाही. गरज पडली तर शिवसेना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी आई तुळजाभवानीलाही साकडे घातले आणि शेतकऱ्यांचा अंत पाहू नकोस लवकर पाऊस पडू दे असे आशीर्वाद मागितले.