News Flash

“भाषण पाठ करून गेलो अन् विसरलो”; उद्धव ठाकरेंनी सांगितला पहिल्या भाषणाचा किस्सा

"माझं याच्यामध्ये खरंच काही कर्तृत्व नाही."

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या विषयावर भाष्य करतानाच शिवसेनेच्या आतापर्यंतच्या प्रवासवर. त्याचबरोबर त्यांच्या शिवसेनेतील वाटचालीबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत सक्रिय झाल्यानंतर केलेल्या पहिल्या भाषणाचा किस्साही सांगितला.

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. त्याचबरोबर शिवसेनेच्या राजकीय भूमिकेबद्दल मतं मांडली.

“युवासेनेचे नेते होतात आता साठीत पदार्पण करता आहात, म्हणजे सीनियर सिटीजन्स झालात कसं वाटतंय?,” असा प्रश्न संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,”आता असं वाटतं की, हा प्रवास बुलेट ट्रेनच्या वेगानं झाला. आपल्याला इकडे तिकडे बघायलाच मिळालं नाही. या सगळ्या काळामध्ये मी अत्यंत प्रामाणिकपणानं सांगतो असं काहीजण जे म्हणतात ते खरं आहे की, माझं हे क्षेत्र नाही. खरंच माझं हे क्षेत्र नाहीये. मी मूळचा कलाकार. कलाकार. ते करताना केवळ केवळ शिवसेनाप्रमुखांना म्हणजे माझ्या वडिलांना एक सहकार्य व्हावं आपल्यापरीनं, काहीतरी खारीचा वाटा त्यानिमित्तानं मी सुरूवात केली. माझं सुरूवातीचं पाऊल होतं सामना! कारण तेव्हा मी बघत होतो… हे सगळं सांगून झालंय. पण, शिवसेनाप्रमुखांनंतर उसंत नव्हती. तेव्हा आतासारखी साधनं नव्हती. हेलिकॉप्टर नव्हते. विमान नव्हती. अगदी कुठेही जायचं झालं तरी गाडीनं प्रवास करावा लागायचा. त्याच्यात सुद्धा एअर कंडिशन गाडी असणं ही सुद्धा खूप मोठी चैनीची गोष्ट होती. अनेक शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते आणि आज सुद्धा काही जण एसटीतून फिरतात. तेव्हा फिरायचे. अगदी वामनराव महाडिक असेल, दत्ताजी असतील, त्यांच्यासोबतचे काही कार्यकर्ते. त्यांचं कर्तृत्व फार मोठं आहे. त्यांनी त्यावेळेला या सगळ्या खस्ता खात खात, शिवसेना पसरवली. बिजं पेरली. ती बिजं रुजवली आणि त्याला आलेले जे काही अंकुर आहेत. ते मी आज बघतोय. म्हणजे जसं पूर्वी कोकणात म्हणायचे की, नारळाच झाड आजोबानं लावल तर नातवाला फळ मिळतं. आज त्यांनी लावलेल्या झाडाची फळं आपण चाखतो आहोत. त्यामुळे त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं योगदान हे फार मोठं आहे. माझं याच्यामध्ये खरंच काही कर्तृत्व नाही. केवळ आणि केवळ मी याच्यामध्ये मनापासून सहभागी झालो. कोणतीही जबाबदारी स्वीकारली की प्राणपणानं पार पाडायची. पक्ष संघटनेत ज्याला आपण शिस्त आणणं म्हणतो किंवा यंत्रणा उभी करणं असेल यातून मी हळू हळू पुढे गेलो,” असं ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,” मी हा सुद्धा अनुभव सांगितलेला आहे की, सुरूवातीला मी भाषणच करत नव्हतो. तेव्हाही माझं म्हणणं होतं की मला भाषण येत नाही. आताही माझं म्हणणं आहे की, मला येत नाही. आधी एका ठिकाणी मला जबरदस्तीनं बोलावण्यात आलं. तेव्हा मी ठरवलं की, भाषण करायचंच, कारण लोकांना कळू नये की, मला काही येत नाही. मी भाषण आधी लिहिलं. पाठ करून गेलो. माईकसमोर उभं राहिल्यावर मला भाषणच आठवेना. तेव्हा मला जे सुचलं ते बोललो आणि त्याही भाषणाला टाळ्या मिळाल्या. असंच माझं भाषण करत करत मी इथपर्यंत आलो. अनुभव तुम्हाला एखाद्या गोष्टीचा असायलाच पाहिजे असं नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी पहिल्या भाषणाचा प्रसंग आठवताना सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 9:40 am

Web Title: uddhav thackeray told about his first political speech bmh 90
Next Stories
1 “…म्हणून मी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली”, उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण
2 “ही अशी लोकशाही तुम्ही मानता?”, राजस्थानमधील सत्तासंघर्षावरुन उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका
3 काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला झुकतं माप दिलं जातं आहे का? मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ उत्तर
Just Now!
X