महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. कोकणावर अन्याय करणाऱ्याची राख करु असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पाचं समर्थन करणाऱ्यांसोबत भाजपा पक्षाला दिला आहे. नाणारमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. सभेदरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपा पक्षावर जोरदार हल्ला चढवला. उद्याोगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी भूसंपादनाची मूळ अधिसूचना रद्द करत असल्याची घोषणा केली.

भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरे यांनी इतके दिवस जी परिस्थिती होती त्यावर हातोडा मारण्यासाठी आलो आहे असं सांगितलं. नाणारचा प्रकल्प गेला, नाणार नाणारच राहणार असंही ते यावेळी बोलले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यापाऱ्यांनी जमिनी खरेदी केल्यावरुन प्रश्न उपस्थित करत या प्रकल्पाचा वास यांच्या नाकात गेला कधी अशी विचारणा केली.

हे सरकार आल्यावर घोटाळा होणार नाही असा दावा करण्यात आला होता. पण हा तर सर्वात मोठा भूसंपादन घोटाळा असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. सरकार पाचपटीने भाव देणार असल्याची माहिती मिळाली आहे, पैशाची मस्ती तुम्ही करा पण इथे चालणार नाही. एकदेखील शिवबाचा मावळा कधीच विकला जाऊ शकत नाही असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितलं.

हा प्रकल्प नाही झाला तर गुजरातला जाईल अशी धमकी देतात. आमचं काही म्हणणं नाही घेऊन जा. आशिष देशमुख यांनी नागपुरात नेऊ असं म्हटलं आहे. हा प्रकल्प माझ्या विदर्भात जात असेल तर जाऊ दे असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. सोबतच महाऱाष्ट्राचं गुजरात होऊ देणार नाही असा इशाराही दिला.

प्रकल्प व्हावा ही मुख्यमंत्र्यांची इच्छा होती. कोकणातील शेतकऱ्यांसोबत त्यांची भेट घेतली असता प्रकल्प लादणार नाही असा शब्द दिला होता. पण मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला दिल्लीत कवडीची किंमत नाही याचं दुख: असल्याचं उद्धव ठाकरे बोलले. राज्याच्या हितासाठी असलेल्या एका तरी गोष्टीत शिवसेनेने तंगड घातलं असल्याचं दाखवा असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.

आम्ही देशाचे भक्त आहोत, एका व्यक्तीचे नाही. तुमची शिकवण आमच्या रक्तात येऊन ते नासू देणार नाही असा टोला यावेळी उद्दव ठाकरेंनी भाजपाला मारला. सोबतच भाजपाला आव्हान देत प्रकल्पाची बाजू मांडणारी सभा घेऊन दाखवावी असं म्हटलं आहे.

सत्तेत असलो तरी ताटाखालचं मांजर झालो नाही, आमच्यातील वाघ जिवंत आहे असं उद्धव ठाकरे बोलले. तुम्ही आमच्या जमिनी खरेदी करु शकता पण आमच्यातील देशभक्ती तुम्ही खरेदी करु शकणार नाही. आज आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो आहे, पण तुम्ही जुलूम केला तर आम्हाला देखील बेकायदेशीर मार्गाने जावं लागेल. जमिनींची मोजणी करायला येणाऱ्यांना आडवा, तुमच्या पद्धतीने आडवा असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं.