मागील खरीप हंगामात दुष्काळामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असले, तरी विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यास तयार नसल्याच्या शेतक ऱ्यांच्या तक्रारी आहेत. या संदर्भातील तपशीलवार माहिती द्या, मग या कंपन्यांना सरळ नाही तर वाकडे करून सोडतो, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी इशारा दिला.

शिवसेनेच्या वतीने जालना तालुक्यातील साळेगाव येथील चारा छावणीत गुरे आणलेल्या शेतक ऱ्यांना आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, विमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत आहेत. देशात कुठेही कार्यालये असली तरी शेतक ऱ्यांना न्याय मिळवून द्यावा लागेल. जनतेचा जोपर्यंत विश्वास आहे, तोपर्यंत मी टीकाकारांना घाबरणार नाही. केंद्रीय पातळीवरील महायुतीत शिवसेना क्रमांक दोनचा पक्ष आहे. महायुतीच्या बैठकीत मी महाराष्ट्राचा पाणीप्रश्न मांडला होता. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली अकरा धरणे जलवाहिनीद्वारे जोडण्याची योजना चांगली आहे. चांगल्या कामांसाठी आपण मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहोत. या योजनेसाठी निधी हवा असेल, तर हक्काने पंतप्रधानांकडे मागू, असेही ते म्हणाले.

जालना जिल्ह्य़ातील दुष्काळी जनतेच्या मदतीसाठी करत असलेल्या कामाबद्दल स्थानिक नेतृत्वाचे उद्धव ठाकरे यांनी कौतुकही केले. राज्यमंत्री खोतकर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी ते म्हणाले, शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शेतकरी आणि दुष्काळी भागातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. खरिपातील पीक विमा मंजूर करताना शेतक ऱ्यांवर अन्याय झाला आहे, असेही खोतकर म्हणाले.

या वेळी औरंगाबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आदींची भाषणे झाले. या प्रसंगी शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार शिवाजीराव चोथे, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, भाऊसाहेब पाऊलबुद्धे आदींची उपस्थिती होती.