मला खुर्ची नको फक्त जनतेचं प्रेम हवं आहे. सत्तेत राहून जर त्यांच्या डोक्यावर बसून तुमची कामं करुन घेत असेल तर आणखी काय पाहिजे. सत्तेसाठी मी कधीच लाचार होणार नाही, लाचारी माझ्या वडिलांनी कधी शिकवलीच नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. रविवारी शिर्डीत कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासह साईबाबांचे दर्शन घेतले.

उद्धव ठाकरे म्हणाले, कालच पंतप्रधान शिर्डीत येऊन २०१९ला आम्हीच येणार असे सांगून गेले. इथल्या लोकांशी त्यांनी मराठीत संवाद साधला आणि कसं काय आहे विचारलं. मात्र, राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर असं विचारण ही लोकांची थट्टा आहे. साईबाबांचा आशिर्वाद सर्वांनाच आहे. त्यामुळे आपणही स्वबळावर सत्तेत येण्यास आशावादी असल्याचे त्यांनी सूचकपणे सांगितले. त्याचबरोबर आजपासून शिर्डीतून साईबाबांच्या आशिर्वादाने राज्यभरात कार्यकर्ता मेळाव्यांना सुरुवात करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

भाजपावर निशाणा साधताना ते म्हणाले, माझ्या वडिलांनी मला लाचारी शिवकवली नाही, त्यामुळे सत्तेसाठी मी कधीही लाचार होणार नाही. शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्याने भाजपाला काहीही फरक पडणार नाही. जसं चंद्राबाबू नायडून एनडीएतून बाहेर पडले मात्र सरकारला काहीही फरक पडला नाही. मात्र, सत्तेत असलो तरी सत्ताधाऱ्यांच्या डोक्यावर बसून तुमची कामं करुन घेऊ शकतो. केवळ सत्ता आहे म्हणून शेपूट हालवणारा मी नाही तर हातातला चाबूक ओढणारा आहे.

सध्या खोटं बोल पण रेटून बोल अशी राजकीय स्थिती आहे. खाटं बोलून सत्तेत आलेले देशद्रोही आहेत अशा कठोर शब्दांत त्यांनी यावेळी भाजपावर निशाणा साधला.