भारतात होत असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये हाफिज सईद, जकीउर रहमान लखवी यांच्यासह आयएसआय, पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांची फूस असल्याचे ठोस पुराव्यानिशी चार-पाच महिन्यांत सिद्ध करणार आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. साहित्य संमेलनातील  ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ कार्यक्रमात निकम बोलत होते.

भारतात होत असलेल्या दहशतवादी कारवायांसंदर्भात हाफिज, लखवी यांच्यासह आयएसआय, पाकिस्तानचे लष्कर आणि सरकार यांच्यात हातमिळवणी झाली आहे. याचे सबळ पुरावे हाती आले आहेत. ही बाब ठोस पुराव्यानिशी सिद्ध करणार आहे. मात्र, देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गोपनीय असल्याने या विषयावर आणखी भाष्य करणार नाही, असे निकम यांनी स्पष्ट केले.

निकम यांनी विविध खटल्यांमधील किस्से सांगितले. त्याचप्रमाणे कसाबच्या बिर्याणीच्या मागणीबाबतही भाष्य केले. विशेष सरकारी वकिलाच्या पदाबाबत ते म्हणाले, की विशेष सरकारी वकील हा सरकारी नोकरीत नसतो. तर तो जनतेचा प्रवक्ता असतो. सरकार कोणत्या पक्षाचे आहे याच्याशी त्याला कर्तव्य नसते.

आपल्या आजवरच्या अनुभवात अनेक खळबळजनक, रोमांचक आणि हृदयद्रावक कथा असल्या तरी जातीय विद्वेष होऊ न सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये या उद्देशातून मी त्याचे लेखन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठी माध्यमातून अभ्यास करुनही आपल्याला मोठय़ा प्रमाणावर यश संपादन करता येते. वकिलाजवळ कायद्याच्या अभ्यासाबरोबरच अभिनयही असावा लागतो, असेही ते म्हणाले.

अनुभवांच्या बोलांतून ‘प्रतिभावंतांच्या सहवासात..’

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि रंगकर्मी व जाहिरात क्षेत्रातील भरत दाभोलकर यांनी सांगितलेले विविध किस्से आणि अनुभवांच्या बोलांमधून रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात  ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ कार्यक्रम रंगला. उत्तरा मोने आणि राजेंद्र हुंजे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

हट्टंगडी म्हणाल्या, की मराठी माध्यमात शिकल्यावर  इंग्रजी भाषेत संभाषण करता येत नाही, असा न्यूनगंड वाटू लागतो. संभाषण कलेचा आत्मविश्वास आला की जग जिंकता येते. त्यासाठी इंग्रजी शाळेत जाण्याची गरज नसते. नाटक, चित्रपट या माध्यमात वावरताना भाषा व साहित्यावरील प्रेम अधिकच दृढ होते. सध्या मनोरंजनाच्या माध्यमांचा भडिमार होत असताना लोककला लोप पावत आहेत. त्या का लोप पावत आहेत, हा अभ्यासाचा विषय आहे. साहित्याचा आपला वारसा जपण्यासाठी वाचन केले पाहिजे.  दाभोळकर म्हणाले, की जाहिरात क्षेत्रात मराठी बोलताना मला कधीही कमीपणा वाटला नाही. ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘पुरुष’ आणि ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही नाटके मी इंग्रजीत अनुवादित केली. त्या वेळी मराठीच्या तोडीचे कलाकार  इंग्रजीत नाहीत, हे लक्षात आले. जाहिरातीतील ‘ब्रँड’, व्यक्ती नव्हे तर लोक तयार करतात. या क्षेत्रात सर्जनशीलतेची पातळी घसरत आहे. भाषा टिकवण्याचे काम एका व्यक्तीचे नाही, तर समुदायाचे आहे. सद्गुणांचा अभाव, दुर्गुणांचे प्राबल्य म्हणजे विकृती असे सांगून निकम म्हणाले, की मातृभाषेत शिक्षण घेत असतानाच, इतर भाषाही आत्मसात करायला हव्यात. न्यूनगंड हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. मातृभाषेच्या वाचनातून आत्मविश्वास येतो. आपले म्हणणे ठामपणे मांडता येते.