निसर्ग व पर्यावरणाच्या जतन-संवर्धनाचा संदेश देणाऱ्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा ठाण्याच्या ‘जलवर्धिनी’ संस्थेचे उल्हास परांजपे यांची मानाच्या ‘किर्लोस्कर वसुंधरा सन्मान’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून संजय अणेराव (चिपळूण), प्रेमसागर मेस्त्री (महाड) आणि जिल्पा व प्रशांत निजसुरे (दापोली) ‘वसुंधरा मित्र’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ५ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या महोत्सवात ६ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. महोत्सवाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.श्रीरंग कद्रेकर यांनी मंगळवारी येथे या पुरस्करांची घोषणा केली. जलवर्धिनीचे उल्हास परांजपे यांनी कोकणात पडणारे पावसाचे पाणी साठवणे आणि नियोजन करण्याच्या दृष्टीने मूलभूत संशोधन करून अत्यंत कमी खर्चात पावसाचे पाणी साठवून वर्षभर वापरण्याच्या दृष्टीने मॉडेल्स तयार केली आहेत. २००३ मध्ये त्यांनी जलवर्धिनी ट्रस्टची स्थापना केली. १४ प्रकारच्या साठवण टाक्यांव्दारे जलव्यवस्थापनाची आदर्श पद्धत विकसित करून जलव्यवस्थापनाचे तंत्र परांजपे यांनी सादर केले आहे. अशा प्रकारच्या १ ते २० हजार लिटपर्यंत क्षमतेच्या टाक्या त्यांनी बांधल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात स्थानिक गवंडय़ांना टाक्या बांधण्याचे प्रशिक्षणही परांजपेंनी दिले आहे. कर्जत, कशेळे, दापोली, शिरगाव इत्यादी ठिकाणी त्यांनी या विषयावरील संशोधन केंद्रे स्थापन केली आहेत.
‘वसुंधरा मित्र’ पुरस्काराचे मानकरी प्रेमसागर मेस्त्री महाड येथे शिक्षक असून ‘धोक्यातील प्रजातींचा अधिवास’ या विषयावर त्यांचे विशेष संशोधन आहे. गिधाडांच्या घटत्या संख्येवर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी महाड तालुक्यात विशेष अभ्यास व संवर्धन केंद्रे स्थापन केली आहेत. तसेच ५४ गावांमधून जनजागृती कार्यक्रम राबवले आहेत. सोसायटी ऑफ इको एन्डेन्जर्ड स्पेशिज कॉन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन (सिस्कॅप) या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत.
चिपळूणचे संजीव अणेराव यांनी जंगलतोड व कोळसा भट्टय़ांच्या विरोधात सातत्याने लढा दिला असून या व्यवसायावर बंदी घालण्यासाठी जनहित याचिका दाखल केली. त्यातूनच १९८७ मध्ये कोकणातील कोळसा भट्टय़ांवर कायमस्वरूपी बंदी घातली गेली. १९८७ ते ९३ या काळात अणेराव यांनी टाटा समाजविज्ञान संस्थेच्या सहकार्याने पर्यावरणावर वृक्षतोडीचा होणाऱ्या विघातक परिणामांचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर केला. वृक्षतोड बंदीबाबत कायदा सुधारणा प्रक्रियेत अणेराव यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे.
शेती व पर्यावरणविषयक तांत्रिक सल्ला आणि मार्गदर्शन करणाऱ्या जिल्पा व प्रशांत निजसुरे या दांपत्याने निसर्गाबद्दल जाणीव जागृतीसाठी बुक मार्क्‍स, फिल्ड कार्डस, निसर्गचित्रे इत्यादींची निर्मिती केली आहे. दापोली तालुक्यातील अंजर्ले या गावी त्यांनी कोमल शेती व निसर्ग परिचय केंद्र सुरू केले आहे. तसेच ‘कोमल’ या ई-वार्तापत्राव्दारे ते निसर्ग आणि पर्यटनविषयक जाणीव व्यापक पातळीवर पसरवण्याचे कार्य करत आहेत.
महोत्सवामध्ये यंदा ‘पाणी’ या विषयावर सुमारे ४० माहितीपट-लघुपट प्रदर्शित
होणार असून इच्छुकांनी प्रा. वासुदेव
आठल्ये (८०८७११८०१७) किंवा बापू गवाणकर (९४२०१५८०८०) यांच्याशी संपर्क साधावा.