राष्ट्रवादी महिला आमदारांना बेदखल करीत शनिवारी केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत तासगावमध्ये झालेल्या कार्यक्रमात राजकीय मानापमान चांगलेच गाजले. प्रभू यांनी कष्टाळू शेतकऱ्यांना भारतरत्न द्यायला हवा असे सांगत गोंजारण्याचा केलेला प्रयत्न आणि अतिरिक्त उत्पादनामुळे शेतीमालाला रास्त दर मिळत नसल्याची कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंग यांनी व्यक्त केलेली खंत यामुळे ना बेदाणा व्यापाऱ्यांच्या पदरी निराशाच पडली.

बेदाणा असोसिएशनला २५ वर्षे झाल्याबद्दल रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी तासगाव येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री प्रभू आणि कृषी राज्यमंत्री शेखावत यांच्या स्वागतासाठी बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील, बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील थांबले होते. मात्र स्वागत न स्वीकारता मंत्र्यांचा ताफा तसाच कार्यक्रमस्थळी रवाना झाला. या प्रकारामुळे स्थानिक आमदारांचा अवमान जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या प्रसिध्दिपत्रकात करण्यात आला.

या कार्यक्रमात बोलताना मंत्री प्रभू यांनी कमी पाण्यावर उच्च कोटीची द्राक्ष उत्पादन करण्याबरोबरच एकेकाळी बेदाणा निर्मितीतही अव्वल स्थान  पटकावणाऱ्या या शेतकऱ्यांना भारतरत्न मिळायला हवा असे सांगितले. तर केंद्र शासनाने अ‍ॅग्रीकल्चर एक्सपोर्ट पॉलिसी स्वीकारली असून यामुळे देशातून ८ लाख कोटींचा माल निर्यात होण्यास चालना मिळणार आहे. याचा लाभ शेतकरी वर्गाला होईल.

तर यावेळी बोलताना राज्यमंत्री शेखावत म्हणाले की, अतिरिक्त शेतीमाल उत्पादनामुळे दर मिळत नाही, यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी जादा दराच्या शेतीमालाचे उत्पादन घ्यावे असा सल्ला दिला. मोदींच्या धोरणामुळेच शेतकरी सुखी होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

खा. संजयकाका पाटील यांनी  शेतीमालाच्या व्यापाऱ्यांना सेवाकराच्या लागू करण्यात आलेल्या नोटीसाबाबत पुढील आठवडय़ात सकारात्मक निर्णय होईल असे सांगितले.

खासदारांची दमबाजी!

प्रास्ताविक सुरू असताना भाजपचे आ. सुरेश खाडे हे केंद्रीय मंत्री प्रभू यांच्याशी कानगोष्टी करण्यात मग्न असताना खासदार संजयकाका पाटील यांचे याकडे लक्ष गेले. त्यावेळी ‘भाऊ आम्ही मंत्र्यांना आणले आहे. आमचा उद्देश अगोदर सफल होऊ दे’ असा दमवजा इशारा दिला. यानंतर खाडे यांनी पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत मौन बाळगले. या दमबाजीची चर्चा सुरू होती.