गाय, गोरक्षक आणि गोमांस यावरून हाणामारी, हत्या यांसारख्या घटना घडत असताना अशा सगळ्या कथित गोरक्षकांच्या डोळ्यात अंजन घालणारा एक उपक्रम औरंगाबादमध्ये सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबादच्या मुस्लिम मोहल्ल्यातून गायीसाठी ‘रोटी’ जमा केली जाते. फिरदोस फातिमा आणि त्यांचे सहकारी मिळून हा उपक्रम चालवतात. जेवणात शिल्लक राहिलेल्या भाकरी कचऱ्यात फेकल्या जात असल्याचे फिरदोस फातिमा यांच्या निदर्शनास आले. एका घरातून दोन भाकरी हे प्रमाण धरले तरीही मोठ्या प्रमाणावर भाकऱ्या वाया जातात. त्या जाऊ नयेत म्हणून या शिल्लक राहिलेल्या भाकरी जमा करण्याचे काम फातिमा यांनी हाती घेतले आणि या भाकरी गायीला खायला घालण्याचे काम त्या करतात.

या कामात फिरदोस फातिमा यांना समीना बेगम जफर खान, नुजहत मुश्ताक पटेल, शेख हसीना, जायरा बेगम, तस्लिमा शेख , नाबेरा बी सय्यद करीम यांचे देखील सहकार्य लाभते. सगळे मिळून मोठ्या आवडीने हे काम करतात. घरोघरी फिरून भाकऱ्या जमा करायच्या त्या वाळवून महानगरपालिकेचे कर्मचारी सुनील खोतकर यांच्या स्वाधीन करायचे काम या महिला करतात. सुनील खोतकर महानगपालिकेच्या कचरा जमा करण्याची गाडी चालवतात. सुनील खोतकर हे या भाकरी जमा करून गोशाळेत देतात.

देशभर गोमांसबंदी आणि गोरक्षक या मुद्द्यावर सुरु असलेल्या राजकारणाबद्दल फिरदोस फातिमा यांना विचारले असता, प्रत्येकाने काय खायला हवं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. कोणीही आपले मत दुसऱ्यावर लादू नये असे त्या म्हटल्या. उपक्रमाबद्दल बोलत असताना कचऱ्यात जाणारे अन्न मुक्या प्राण्यांच्या मुखात गेले तर खऱ्या अर्थाने मानवता असल्याचे त्या सांगतात. आपल्या परिसरातील नागरिक न चुकता शिल्लक राहिलेल्या भाकरी बाजूला काढून आमच्याकडे देतात त्यामुळे हे काम सुरु आहे.