घराघरांवर चित्ररूपी धडे; विद्यार्थ्यांचे शिक्षण पुन्हा सुरू 

एजाजहुसेन मुजावर, लोकसत्ता

सोलापूर : करोनामुळे ‘ऑनलाइन’ झालेल्या शिक्षणाने ग्रामीण भागांतील गरिब विद्यार्थ्यांपुढे मोठे संकट उभे केले. एका बाजूला शाळा बंद, तर दुसरीकडे धडे गिरवण्यासाठी ना ‘स्मार्टफोन’ आहे ना ‘लॅपटॉप’. या अडचणीवर मात करत येथील एका श्रमीकांच्या वस्तीतील शिक्षकांनी परिसरातील भिंतींनाच बोलके करत त्यांचे फळे केले आणि या गरीब मुलांचे थांबलेले शिक्षणही पुन्हा सुरू झाले.

सोलापूर शहरातील नीलमनगर परिसर हा गोरगरीब श्रमिक, घरकामगारांचा म्हणून ओळखला जातो. या वसाहतींमध्ये भारत शिक्षण मंडळाच्या आशा मराठी विद्यालय आणि धर्मण्णा सादूल प्रशाला कार्यरत आहेत. असंघटित कामगारांची बहुतांश मुले या दोन्ही शाळांमध्ये शिकतात. परंतु करोनामुळे शाळा बंद झाल्या आणि या गरीब घरातील मुलांचे शिक्षण थांबले.   कारण ‘ऑनलाइन’ शिक्षणासाठी इथल्या बहुसंख्य विद्यार्थी व पालकांकडे साधे ‘स्मार्टफोन’ही नाहीत. त्यामुळे निम्मे शैक्षणिक वर्ष संपले तरी या विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे हा प्रश्न इथल्या शाळा-शिक्षकांपुढे होता.

यावर खूप विचार केल्यावर येथील राम गायकवाड या शिक्षकाने शाळा परिसरातील घरांच्या भिंतीवरच धडे गिरवण्याची कल्पना मांडली. कल्पना सगळय़ांना आवडली, पण यासाठी भिंतीची उपलब्धता,  रंगवण्याचा खर्च, कारागिर हा प्रश्न पुढे आला. पण मग या साठी भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हारून पठाण यांनी पाठिंबा दिला. अन्य शिक्षकांसह शिक्षण संस्थेनेही हातभार लावला. एवढेच नव्हे तर माजी विद्याथ्र्यी तसेच गावकऱ्यांनीही मदतीचा हात पुढे केला.

हे सारे कसे झाले?

परिसरातील एकूण तीनशे भिंती निवडल्या गेल्या. यातील १८० भिंतींवर अभ्यास लिहिला गेला. मराठी म्हणी, सुविचारांसह मराठी व इंग्रजी व्याकरण, भूमिती व गणिताची सूत्रे, प्रमेय, पाढे, विज्ञानाचा शोध, सामाजिकशास्त्रांचे पाठ इत्यादी शैक्षणिक माहिती रेखाटण्यात आली. आता या परिसरात राहणारी मुले येता-जाता हे पाठ गिरवतात. करोनाची काळजी घेत मुलांचे शिक्षण यातून सुरू झाले आहे.

टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या घरांतील मुलेही शैक्षणिक प्रवाहात टिकून राहावीत म्हणून ही संकल्पना मांडली. यामध्ये घरांच्या भिंतींवरच अभ्यास शिकवला जात असल्याने मुलांचे हसत खेळत शिक्षण सुरू झाले.

–  राम गायकवाड, शिक्षक