येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अनंत मोभारकर यांना आज, मंगळवारी सकाळी वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारात पाच अनोळखी व्यक्तींनी बेदम मारहाण केली. यासंदर्भात मोभारकर यांनी फिर्यादीत मारहाण करणारे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले व माजी उपमहापौर नजीर शेख यांचेच आहेत, असा संशय संशय व्यक्त केला आहे. मोभारकर जखमी असून जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कोतवाली पोलिसांनी पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून संशयित म्हणून आ. कर्डिले व नजीर शेख यांचीही नावे नोंदवली आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक एस. ई मालकर करत आहेत. मालकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गुन्हय़ाच्या ठिकाणी कर्डिले व शेख दोघेही हजर नव्हते, त्यामुळे चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.
मोभारकर रोज सकाळी ९ ते १० वेळात जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावावर पोहण्यासाठी जातात. पोहणे आटोपून ते इतर मित्रांसमवेत संकुलासमोरील चहाच्या टपरीकडे दुचाकीवरून (एमएच १६-२००७) जात असतानाच पाच जण चेहऱ्याला मास्क लावून आले. त्यातील तिघांनी गॉगल लावला होता. दोघे एका बाजूने व तिघे दुसऱ्या बाजूने आले. त्यांनी ‘हमारे बॉस के खिलाफ कोर्ट मे साक्ष देता क्या’ असे म्हणून हातातील लोखंडी पाइपने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एक जण मराठीत ‘आता तुला जिवंत सोडणार नाही’, असेही म्हणत होता. मोभारकर खाली पडले. आरडाओरडा करू लागले. त्यामुळे त्यांचे मित्र व इतर लोक तेथे जमा झाल्यावर हल्लेखोर पळून गेले. नंतर मोभारकर यांना रिक्षातून सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी माजी उपमहापौर नजीर शेख यांच्या विरुद्ध आपण व नीलेश सुपेकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जबाब दिला, तसेच अशोक लांडे खूनप्रकरणात नाशिक येथील न्यायालयात आपण साक्ष दिल्याने आ. कर्डिले यांनी नगरच्या न्यायालयात आवारात आपल्याला धमकी दिली होती, त्यामुळे मारहाण करणारे कर्डिले व शेख यांचेच आहेत, असेही मोभारकर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.