अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत रोह्य़ातील एका रुग्णालयात विनापरवाना औषधांचे दुकान सुरू असल्याचे उघड झाले आहे. या दुकानातातून जवळपास ४ लाख ३० हजार रुपयांची औषधे व महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
रोह्य़ातील डॉ. देवेंद्र जाधव यांच्या सुमन नेत्रालय या रुग्णालयात विनापरवाना औषधांचे दुकान सुरू असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. साहाय्यक आयुक्त (औषधे) सा. रा. साळुंखे, औषध निरीक्षक तासखेडकर व गादेवार यांच्या पथकाने सुमन नेत्रालय या रुग्णालयावर धाड टाकली. तेथे चौकशी केली असता या डॉक्टरने रुग्णालयाच्या आवारातील एका गाळ्यामध्ये विनापरवाना औषधाचे दुकान सुरू केल्याचे आढळून आले. या दुकानातून सुमारे ४ लाख ३० हजार रुपये किमतीची विविध औषधे व इतर कागदपत्रे असा मुद्देमाल डॉ. जाधव यांच्याकडून धाडीअंतर्गत जप्त करण्यात आला. अधिक चौकशी केली असता यापूर्वी उपरोक्त जागी एका रजिस्टर्ड फार्मासिस्टला किरकोळ औषध विक्रीसाठी परवाने मंजूर होते. हे परवाने त्यांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये रद्द करण्यासाठी प्रशासनाला सादर केले होते. ते परवाने प्रशासनाने रद्द केल्यानंतर दुकानाचा ताबा डॉक्टरकडे देण्यात आला होता. डॉक्टरांनी त्यानंतर या ठिकाणी औषधाचे दुकान विनापरवाना सुरू केल्याचे आढळून आले. ही बाब औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० च्या कमल १८ (क) चे उल्लंघन करणारी आहे.
याबाबत चौकशी करून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० कलम १८ (क) चे उल्लंघनाबाबत डॉक्टरांच्या विरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे. याबाबतच्या कायद्याखालील आरोपीस ३ ते ५ वर्षे शिक्षा व जप्त मुद्देमालाच्या ३ पट म्हणजे सुमारे १२.९ लाख एवढा दंड होऊ शकतो, असे अन्न व औषध प्रशासनाचे साहायक आयुक्त साळुंखे यांनी सांगितले.