प्रबोध देशपांडे
अकोला : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यांमधून येणाऱ्या व्यक्तींना विलगीकरण करून करोना तपासणीसाठी स्त्रावाचे नमुने घेण्याचे प्रकार होत आहे. त्यामुळे प्रयोगशाळांवर ताण वाढला असून, आता यापुढे ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनानुसार नमुने घेण्याचे निर्देश आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिले आहेत. लक्षण आढळून आले तरच नमुने घेणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात करोनाचा प्रकोप चांगलाच वाढत आहे. दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. राज्यातील प्रयोगशाळांवर करोना तपासणीचाही मोठा ताण आला आहे. दररोज तपासणीच्या नमुन्यांमध्ये मोठ्या संख्येने भर पडते. त्यातच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यातून दाखल झालेल्या प्रत्येक प्रवाशाला विलगीकरणात ठेवून त्याची करोना चाचणी करण्याचे प्रकार होत आहेत. नमुने घेण्यासंदर्भात ‘आयसीएमआर’ने १८ मे रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास असलेले सर्व लक्षणात्मक व्यक्ती, प्रयोगशाळेने पुष्टी केलेल्या प्रकरणांच्या संपर्कात आलेले, आरोग्य सेवा कर्मचारी, ‘फ्रंटलाइन’ कामगार, गंभीर तीव्र श्वासन संक्रमणचे सर्व रुग्ण, उच्च जोखीम संपर्क, हॉटस्पॉट व प्रतिबंधित क्षेत्रातील लक्षणे असलेली व्यक्ती, रुग्णालयात दाखल लक्षणे विकसित करणारे रुग्ण, आजारपणाच्या सात दिवसांत परत आलेल्या आणि स्थलांतरित लोकांमधील सर्व रोगसूचक आजार आदींचे नमुने घेऊन तपासणीच्या सूचना आहेत.

कोणतीही आपत्कालीन प्रक्रिया प्रसुतींसह चाचणी अभावी उशीर होऊ नये, तीव्र ताप, श्वासोच्छवास, खोकला संसर्गामध्ये रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. या सर्व श्रेणीमध्ये आरटी-पीसीआर चाचणीची शिफारस ‘आयसीएमआर’ने केली आहे. राज्यात आता ‘आयसीएमआर’च्या सूचनानुसारच नमुने घेण्यात यावे, कोणतीही लक्षणे नसतांना नमुने घेण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश आरोग्य सेवा संचालनालयाने राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकीत्सक, आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.

परिणामी, अत्यावश्यक तपासणीला विलंब
काही ठिकाणी लक्षणे नसतांना नमुने घेण्यात येत असल्याने प्रयोगशाळांवर विनाकारण ताण येत आहे. त्यामुळे प्रयोगशाळांचे अहवाल येण्यास विलंब होतो. या प्रकारामुळे ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आहेत किंवा जे ‘हायरिस्क’ आहेत, अशांच्या नमुन्यांची तपासणी सुद्धा वेळेवर होत नाही. परिणामी, वेळेवर उपचार होऊ शकत नाहीत, असे चित्र निर्माण झाले होते.