सोनेगावच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पक्ष्यांच्या वाढत्या वावरामुळे नागपूरचे आकाश हवाई वाहतुकीसाठी धोकाप्रवण क्षेत्र झाले असून विमानतळ सुरक्षेच्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्याच आठवडय़ात नागपूर विमानतळावर पक्ष्याची धडक बसल्याने एक विमान उतरवावे लागले, तर दुसरे विमान हैदराबादच्या दिशेने वळवावे लागले. दोन्ही घटना अत्यंत गंभीर आणि प्रवाशांच्या जिवावर बेतणाऱ्या होत्या. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही; परंतु विमानतळ परिसराच्या आसपास विहरणारे पक्षी अस्तित्व आणि त्यांच्यामुळे विमान वाहतुकीला असलेला संभाव्य धोका असे दोन्ही विषय या निमित्ताने ऐरणीवर आले आहेत.
विमानतळाच्या धावपट्टीनजीकचे कुरण, परिसराभोवतीची पाणस्थळे आणि महापालिकेच्या नाकावर टिच्चून उघडय़ावर ठिय्या देऊन बसलेली मटण विक्रेत्यांची दुकाने जबाबदार ठरू लागली आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमानतळाचे नियंत्रण केले जात आहे का, असा महत्त्वाचा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. नागपूर विमानतळावर यापूर्वीही विमानतळाच्या धावपट्टीवर हरिण आणि डुक्कर येण्याच्या घटनादेखील घडलेल्या आहेत. वन्यजीव आणि पक्षी विमानतळाच्या परिसरात आकर्षित का होतात, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असून आंतरराष्ट्रीय हवाई मार्गासाठीच्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याच्या दृष्टीने विमानतळ प्राधिकरणाला अधिक सतर्कता बाळगण्याचाच इशारा यानिमित्ताने मिळाला असतानाही भूतकाळातील दुर्घटनांपासून विमानतळ प्राधिकरणाने कोणताही धडा शिकलेला नसल्याचेही सत्य उजागर झाले आहे.
हवाई वाहतुकीच्या आंतरराष्ट्रीय मानांकाकडे विमानतळ प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याचे अलीकडच्या दोन वर्षांतील घटनांवरून स्पष्ट झाले आहे. १९८०च्या दशकातील विमान अपघातानंतर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील हवाई विकास व संशोधन मंडळाने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीला पक्ष्यांमुळे होणाऱ्या विमान अपघातांची कारणमीमांसा करण्याची जबाबदारी सोपविली होती. यासाठी ग्वाल्हेर, अंबाला, खरगपूर, जोधपूर, श्रीनगर, जम्मू, कलाईकुंड, हैदराबाद, अंबाला, त्रिवेंद्रम, पाटणा, मुंबई, दिल्ली, आग्रा, चेन्नई, कोलकाता नागपूरसह देशभरातील प्रमुख विमानतळ परिसराचे सर्वेक्षण करून डॉ. सलीम अली आणि ग्रुभ यांनी १९८४ साली अहवाल सादर केला. या अहवालात २७ पक्षी प्रजाती हवाई वाहतुकीला धोका निर्माण करू शकतात, असे म्हटले आहे. यात गिधाडे, घार, निळी कबुतरे, टिटवी, मैना, भोवरी, ससाणा, पोपट, बटेर, बगळा, कावळे या प्रजातींचा समावेश करण्यात आला होता. यानंतर २००६ साली याचा र्सवकष अभ्यास करण्यासाठी हवाई धोकाप्रवण अंबाला, आदमपूर, श्रीनगर विमानतळांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. यातून पक्षी प्रजातींपैकी ब्लॅक काईट, टिटवी, कापशी, बगळा, मैना, चंडोल आणि चिमण्या अधिक धोकादायक असल्याचे आढळले. शिवाय विमानतळाभोवतालची शेती, पाणस्थळे, गवताची कुरणे, खाद्यपदार्थाची दुकाने यांचे अस्तित्व यामुळे पक्ष्यांचा वावर वाढत असल्याचे म्हटले आहे.     (क्रमश:)

पक्ष्यांचा वावर संपूर्णपणे रोखणे कुणालाच शक्य नाही. फक्त त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. आम्ही यासंदर्भात पूर्ण काळजी घेत आहोत. आमच्यासाठी प्रवाशांच्या जीविताची सुरक्षा सर्वोच्च आहे. विमानतळाच्या धावपट्टीनजीक पक्ष्यांचे थवे दिसल्यास त्यांना फटाक्यांचे बार काढून उडवून लावले जाते. गवताळ भाग असला तरी गवत नियमित कापले जाते. आता पावसाळ्याचा हंगाम असल्याने अधिक काळजी घेत आहोत. काही अन्य घटकही पक्ष्यांच्या वावरासाठी जबाबदार आहेत. त्यासाठी नागपूर महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांशी आम्ही पर्यावरण समितीच्या बैठकीदरम्यान अनेकदा चर्चा केली असून पत्रेदेखील पाठविली आहेत. नासुप्रकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला; परंतु महापालिकेकडून अद्याप उत्तराची प्रतीक्षा आहे, असे नागपूर विमानतळाचे वरिष्ठ संचालक पी. अनिल कुमार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.